मधुकर ठाकूर, उरण: उरणमध्ये दोन कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या सुट्यांमध्ये सहल, फिरण्याच्या निमित्ताने बाहेर जाऊन आलेल्यांमुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या २० दिवसांपर्यंत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन उरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांनी केले आहे.
उरण तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने परिसरातील गावागावात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. तसेच समाजमाध्यमाव्दारे पोस्टर आणि बॅनरव्दारे सुचना देऊन जनजागृती केली जात आहे.जेएन- १ हा कोरोना व्हेरियंट तितकासा प्रभावी नसला तरी त्याचा मात्र संसर्गाचा प्रभाव अधिक आहे.सर्दी व ताप अशी या नव्याने आलेल्या कोरोनाची लक्षणे आहेत.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही उरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र ईटकरे यांनी आरोग्य विभागाच्या वतीने केले आहे.
कोरोनाची तपासणी करण्याची व्यवस्था उरण शहरातील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. तर पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालय व कामोठे येथील रुग्णालयात कोरोनाबाधीत रुग्णांना दाखल करून उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.सध्या सुट्टी, सणासुदीमुळे सहली , पिकनिक आदी मौजमजा लुटण्यासाठी हजारो नागरिक बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्या परतण्यामुळे कोरोनाच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पुढील १५-२० दिवस नागरिकांनी दक्षता घेण्याची आणि सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र ईटकरे यांनी आवाहन केले आहे.