उमटे धरणावरील जलशुद्धीकरण सुरू, ४१ वर्षांनी ६२ गावांची शुद्ध पाण्याची प्रतीक्षा संपली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 04:51 AM2019-02-04T04:51:15+5:302019-02-04T04:51:24+5:30
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणावर अखेर जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ४१ वर्षांनी ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग - तालुक्यातील उमटे धरणावर अखेर जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ४१ वर्षांनी ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे. ६२ गावे-वाड्यातील सुमारे ६० हजार ग्रामस्थांना उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा फायदा होणार आहे. देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे लोटली तरी, ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत होते. आता शुद्ध पाणीपुरवठा होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये १९७८-७९ या कालावधीत उमटे धरण बांधण्यात आले होते. या धरणामुळे या विभागातील १५ ग्रामपंचायतींमधील तब्बल ५२ हजार ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे; परंतु धरण बांधल्यापासून धरणामध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले नव्हते. त्याचप्रमाणे धरणातील गाळ देखील काढण्यात आलेला नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत होते. आता जल शुद्धीकरण यंत्र बसवण्यात येऊन ते सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याबद्दल ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे विशेष आभार मानले आहेत.
जिल्हा परिषदेने सुमारे साडेसहा कोटी खर्चाच्या जलशुद्धीकरण योजनेला मंजुरीही दिली होती, मात्र ठेकेदाराने काम पूर्ण करण्याआधीच सुमारे दोन कोटी ९० लाख रुपयांची रक्कम अदा केली होती. या विरोधात ग्रामस्थांनी प्रशासन आणि सरकारकडे तक्रारीही केल्या होत्या.
काँग्रेस आणि शिवसेनेने याबाबत रायगड जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. धरण उशाला असल्याने पाणी मुबलक प्रमाणात मिळते; परंतु त्या पाण्यामध्ये कचरा, प्लॅस्टिकचे तुकडे, कुजलेली पाने मोठ्या प्रमाणात आढळायचे. काही वेळेला मृत जनावरेसुद्धा त्यामध्ये पडलेली असायची. यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागायचे.
गावांमध्ये एमआयडीसीचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थ उमटे धरणातील पाणी गाळून घ्यायचे. त्यानंतर त्या पाण्यावर तुरटी फिरवून तेच पाणी पिण्यासाठी वापरायचे. जिल्हा परिषदेने यावर उपाययोजना म्हणून तेथे जल शुद्धीकरण यंत्र बसवणे, पाइप लाइनच्या कामासाठी सुमारे तीन कोटी ३४ लाख रुपये देऊ केले होते. मात्र, आधीच्या ठेकेदाराने काम न करताच तब्बल दोन कोटी ९० लाख रुपयांचा निधी लाटल्याबाबत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अॅड. काँग्रेसचे कौस्तुभ पुनकर, अॅड. राकेश पाटील यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत प्रशासनाने नवीन ठेकेदाराची नेमणूक केली. त्यांनी जलशुद्धीकरण यंत्र बसवल्याने
आता शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
जलशुद्धीकरण यंत्र बसवण्याचे काम देण्यात आले होते. ते काम पूर्ण करण्यात आले आहे. ग्रामस्थांना आता शुद्ध पाणी मिळणार आहे, असे ठेकेदार शशांक सावंतदेसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे मानले विशेष आभार
आधीच्या ठेकेदाराने उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील २ कोटी ९० लाख रुपयांचा निधी हडप केला आहे. त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. याप्रकरणी रायगड जिल्हा प्रशासनाने योग्य ती चौकशी करून संबंधितांकडून रक्कम वसूल करावी, अशी मागणी अॅड. कौस्तुभ पुनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ‘लोकमत’ने सातत्याने याबाबत पाठपुरावा केला होता. आज अखेर ग्रामस्थांना ‘लोकमत’मुळे न्याय मिळाला आहे. त्यामुळे ‘लोकमत’चे आभार मानतो, असेही अॅड. पुनकर यांनी स्पष्ट केले.