नेरळ : नेरळ धरणाजवळ असलेला लहान गतवर्षी पूल मार्च २०१८ मध्ये कोसळला होता. त्यामुळे परिसरातील मोहाचीवाडीसह अनेक वाड्यातील लोकांचा रस्ता बंद झाला होता. या पुलाच्या उभारणीसाठी ग्रामस्थांनी अनेकदा मागणी केली होती. अखेर वर्षभरानंतर पुलाच्या कामासाठी मुहूर्त सापडला असून नेरळ विकास प्राधिकरणने ४० लाखांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, ४० मीटर लांबीच्या पुलाच्या कामाचा शुभारंभ शनिवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
नेरळ येथील गणेश घाट परिसरात असलेल्या पादचारी पुलाचे स्लॅब कोसळल्याने पुलावरून होणारी वाहतूक बंद केली होती. पावसाळ्यात पुलाच्या पलीकडे राहणाऱ्या रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नेरळ ग्रामपंचायतने लोखंडी पुलाची उभारणी करून आदिवासी भागातील आणि मोहाचीवाडीमधील रहिवासी यांच्या जाण्याची व्यवस्था केली. मात्र, रहिवासी यांनी रायगड जिल्हा परिषद आणि नेरळ ग्रामपंचायतकडे पुलाची निर्मिती करण्याची मागणी केली होती.
पुलाची उभारणीसाठी जिल्हा परिषदेने नेरळ विकास प्राधिकरणमधून निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. पुलाच्या कामाचा शुभारंभ झाला असला ४० लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या पुलाचे काम चांगल्या दर्जाचे करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक व आदिवासी बांधवांनी केली आहे.
सर्वसाधारण सभेत प्रस्तावास मंजुरी२८ मे रोजी रायगड परिषद सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी आठवड्याभरात पुलाच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी नेरळच्या सरपंच जान्हवी साळुंखे, उपसरपंच अंकुश शेळके, मानिवली ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण पाटील, तसेच श्रीराम राणे, वर्षा बोराडे, नेरळ ग्रामपंचायतचे सदस्य मंगेश म्हसकर, नीतेश शाह, सदानंद शिंगवा, माजी सदस्य जयवंत साळुंखे यांच्यासह प्रकाश पेमारे, दत्ता ठमके, प्रकाश डायरे आदी उपस्थित होते. सुरुवातीला नेरळ विकास प्राधिकरणचे उपअभियंता प्रवीण आचरेकर यांनी पुलाच्या कामाची माहिती दिली.