महामार्गावर पुन्हा अंधार, अपूर्ण कामांमुळे अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 07:14 AM2018-01-29T07:14:00+5:302018-01-29T07:14:11+5:30
नवी मुंबईमधील ‘फिफा’ विश्वचषक सामन्यांच्या आयोजनामुळे जवळपास पाच वर्षे बंदावस्थेत असलेल्या सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे लखलखले होते. मात्र, ‘फिफा’ वर्ल्डकप संपताच, परिस्थिती जैसे थे झाली आहे. महामार्गावर पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. २५ कि.मी.च्या या मार्गावर अनेक कामे अपूर्णावस्थेत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
- वैभव गायकर
पनवेल : नवी मुंबईमधील ‘फिफा’ विश्वचषक सामन्यांच्या आयोजनामुळे जवळपास पाच वर्षे बंदावस्थेत असलेल्या सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे लखलखले होते. मात्र, ‘फिफा’ वर्ल्डकप संपताच, परिस्थिती जैसे थे झाली आहे. महामार्गावर पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. २५ कि.मी.च्या या मार्गावर अनेक कामे अपूर्णावस्थेत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
‘फिफा’च्या आयोजनामुळे केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी रातोरात शहराचा कायापालट करण्यात आला होता. त्यातच अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सायन-पनवेल महामार्गाचे पथदिवे प्रकाशमय झाले होते. महामार्गाची डागडुजी करण्यात आली होती. तसेच साइडपट्ट्यांची रंगरंगोटी करण्यात आली होती. मार्गावर सजावट करून दुभाजकावर झाडे लावण्यात आली होती. मात्र, ‘फिफा’ वर्ल्डकप संपताच, महामार्गाला पुन्हा पूर्वीचे दिवस आले आहे. पथदिवे बंद असल्याने या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
राज्यातील व्यस्त महामार्गापैकी हा एक महामार्ग असल्याने लाखो वाहनांची दररोज वर्दळ असते. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक आमदार, अनेक मंत्र्यांची याच मार्गावरून ये-जा सुरू असते. तरीही महामार्गावरील मूलभूत समस्या सुटत नसल्याने प्रवासी व वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या मार्गावर टोल वसूल करणाºया एसपीटीपीएल कंपनीचा टोल वसुलीचा ठेका थांबवून, तो सार्वजनिक खात्याच्या माध्यमातून दुसºया कंपनीला देण्यात आला आहे. मात्र, कंपनी बदलली तरी समस्या त्याच आहेत. १२०० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करूनदेखील अद्याप अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. पावसाळी पाण्याचा निचरा करणारी गटारे मोडकळीस आली आहेत, तर पादचाºयांसाठी बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गात पाणी साचले आहे.
कामोठे उड्डाणपुलाजवळ रखडलेल्या मार्गिकेमुळे संपूर्ण कामोठे शहरातील रहिवाशांना शहराला वळसा घालून सायन-पनवेल महामार्ग गाठावा लागत आहे. या रखडलेल्या कामामुळे अपघात झाले असून, अनेकांना जीव गमवावे लागले आहेत.
कामोठेमधील रखडलेल्या मार्गामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, ३ फेब्रुवारी रोजी कामोठेवासीयांतर्फे रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. सद्य स्थितीला या मार्गावर टोल वसुलीचे काम इगल इन्फ्रा प्रायव्हेट कंपनी पाहत आहे. मात्र, दुरुस्ती व डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच महामार्गावरील पथदिवे सुरू होतील, शिवाय समस्यांचे निराकरण करू, याबाबत अधिक माहिती नियुक्त करण्यात आलेली एजन्सीच देऊ शकेल.
- नितीन पवार, उपायुक्त, वाहतूक, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय
महामार्गावरील भुयारी पूल नावापुरतेच
सायन-पनवेल महामार्गावर प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी पूल, खारघर, कामोठे व तळोजा लिंक रोड उड्डाणपूल आदींसह महत्त्वाच्या ठिकाणी तयार केले आहेत. मात्र, ते कार्यान्वित नसल्याने या भुयारी पुलामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
दुभाजकावर लावलेली झाडेही सुकली
सायन-पनवेल महामार्गावर दुभाजकावर झाडे, तसेच शोभेच्या कुंड्या ‘फिफा’ वर्ल्डकप दरम्यान लावण्यात आल्या होत्या. मात्र, ही झाडेदेखील सुकली आहेत. कुंड्याही मोडकळीस आल्या आहेत.