आगरदांडा केंद्र नूतनीकरणासाठी ५० लाखांचा निधी देणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 10:52 PM2021-04-25T22:52:55+5:302021-04-25T22:53:04+5:30
सुनील तटकरे यांनी आगरदांडा केंद्राला दिली भेट : इमारतीचे काम लवकर पूर्ण करा
मुरुड : आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्र हे आजूबाजूच्या गावाला विशेष सेवा देणारे आरोग्य केंद्र असून, येथील दवाखान्याची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून पालकमंत्री यांच्या सहमतीने ५० लाख रुपयांचा निधी तातडीने देणार आहे. आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सुविधा व आवश्यक वस्तू यांची मागणी करावी व निधीचा विनियोग करावा, असे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आदेश दिले आहेत.
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राला रविवारी भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी तटकरे यांनी आरोग्य केंद्राला जोडणारा रस्ता डांबरीकरण करून घेणे, व्हॅक्सिन देण्यासाठी दोन स्वतंत्र खोल्या तयार करणे, व्हॅक्सिन ठेवण्यासाठी डिफ्रीजर व अन्य आवश्यक गोष्टींची मागणी करून आगरदांडा येथील आरोग्य केंद्रातील सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत, जर एक ठेकेदार काम करण्यास अपूर्ण वाटत असेल तर आणखी दुसरा ठेकेदार तातडीने नेमून सर्व कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश तटकरे यांनी दिले आहेत.
यावेळी तटकरे यांनी आरोग्य केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून वेगवेगळे बदल सुचवून व्यवस्थित नियोजन करून या इमारतीचे काम पूर्ण करण्याविषयीच्या सूचना केल्या. या केंद्राला आमदार अनिकेत तटकरे यांचासुद्धा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी सभेत उपविभागीय अधिकारी शैलेश ढगे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता के. वाय. बारदासकर आदी मान्यवर उपस्थित होते.