मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी दिघोडे ग्रामपंचायतीची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 06:31 PM2024-02-16T18:31:39+5:302024-02-16T18:32:04+5:30
कंपनीला सील करून टाळे ठोकले.
मधुकर ठाकूर, उरण : वारंवार नोटीसा बजावल्यानंतरही मालमत्ता कराच्या थकीत असलेल्या एक कोटी ७१ लाख १२ हजार ५०६ रक्कमेच्या वसुलीसाठी दिघोडे ग्रामपंचायतीने कारवाईचा बडगा उगारत ऐसावत फास्टलेन डिस्ट्रीक पार्क अँड लाँजिस्टीक कंपनीला टाळे ठोकले आहे.
दिघोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ऐसावत फास्टलेन डिस्ट्रीक पार्क अँड लाँजिस्टीक कंपनी कार्यरत आहे. कंटेनर मालाची हाताळणी करणाऱ्या या कंपनीने २०१४-१५ ते आजतागायत पर्यंत मालमत्ता कराची १ कोटी ७१ लाख १२ हजार ५०६ रक्कम थकवली आहे.थकित रकमेमुळे ग्रामपंचायतीची अनेक विकासकामे रखडली आहेत.त्यामुळे मागील दहा वर्षांपासून थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी दिघोडे ग्रामपंचायतीने कंपनीला वारंवार नोटीसाही बजावल्या आहेत.मात्र त्यानंतरही कंपनी थकीत रकमेचा भरणा करण्यात टाळाटाळ करीत होती.नोटीस बजावल्यानंतरही थकित रक्कमेचा भरणा दिघोडे ग्रामपंचायत कार्यालयाकडे कंपनीने केला नाही.
यामुळे थकीत रकमेचा वसुलीसाठी शुक्रवारी (१६) दिघोडे ग्रामपंचायतीने धडक कारवाई करीत कंपनी सील करून टाळे ठोकले.या कारवाईमध्ये उरण गटविकास अधिकारी समीर वाठावकर, विस्तार अधिकारी विनोद मिंडे सरपंच किर्तिनिधी ठाकूर, उपसरपंच अभिजित वसंत पाटील,सदस्य अलंकार मनोहर कोळी, कैलास अंबाजी म्हात्रे, संदेश दयानंद पाटील,आरती शक्ती कोळी,रेखा नरहरी कोळी, अपेक्षा राकेश कासकर, उज्वला अनंत म्हात्रे, अपेक्षा अतिश पाटील, ग्रामसेविका मत्स्यगंधा पाटील आदी सहभागी झाले होते.दिघोडे ग्रामपंचायतीच्या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील थकबाकीदार कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.