केंद्र व राज्यातील भडकलेल्या महागाई विरोधात जागतिक महिला दिनीच उरणमध्ये महिलांची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 06:22 PM2023-03-08T18:22:04+5:302023-03-08T18:22:04+5:30
उरणच्या गांधी चौकात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भडकलेल्या महागाई विरोधात निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मधुकर ठाकूर -
उरण : केंद्र व राज्यातील भडकलेल्या महागाई विरोधात रायगड जिल्हा अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने बुधवारी (८) उरणच्या गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. जागतिक महिला दिनीच निदर्शनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
उरणच्या गांधी चौकात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भडकलेल्या महागाई विरोधात निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या निदर्शन कार्यक्रमातुन हेमलता पाटील यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. महागाई वाढविणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कारही करण्यात आला. तर ३५० रुपये किंमतीच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर १ हजार १५० रुपयांवर पोहचला आहे.या महागाईमुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. राज्यातील सरकारकडूनही या वाढत्या महागाईकडे दुर्लक्षच केले जात आहे.केवल पोकळ व फसव्या जाहिराती करून हे सरकार आपली पाठ थोपटून घेत असल्याचा आरोपही हेमलता पाटील यांनी केली.
तर रायगड जिल्हा अध्यक्ष अमिता ठाकूर यांनी महिला दिन हा संघर्ष व त्यागाचा दिवस असून तो करमणुकीचा दिवस होता कामा नये. महिलांचे प्रश्न व त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याचे स्पष्ट करून महिलांनी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. तसेच जेष्ठ महिला कार्यकर्त्या कुसुम ठाकूर,चंपा पाटील,आशा वर्कर संघटनेच्या रसिका घरत व किसान सभेचे सचिव संजय ठाकूर यांचीही यावेळी भाषणे झाली.