दुधाचे भाव घसरल्याने आंदोलन; दूध उत्पादक, शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:36 PM2020-07-20T23:36:13+5:302020-07-20T23:36:27+5:30
अलिबागमध्ये तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन
अलिबाग : दूध उत्पादक आणि शेतकरी अर्थिक संकटात सापडले असून, दुधाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सोमवारी राज्यव्यापी दूध आंदोलन केले. अलिबागमध्येही भाजपने तहसीलदार सचिन शेजाळ यांना निवेदन देऊन आंदोलन केले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लीटर १० रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, तसेच गाईच्या दुधाला ३० रुपये दर द्यावा, या मागण्यांसाठी राज्यभर सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदनासह दुधाच्या पिशव्या भेट देऊन, आंदोलन करण्याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांनी घेतला होता.
महाराष्ट्रातील दुधाचे भाव १६ ते १८ रुपयांपर्यंत घसरले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना संकटामुळे दूध संकलन होत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. या शेतकºयांना दुधाला योग्य तो दर मिळत नाही. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकºयांसाठी घेतलेले निर्णय हे केवळ ठरावीक दूध संघापुरतेच मर्यादित असून, राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे, अशी भावना महायुतीतील घटक पक्षांनी व्यक्त केली. या आंदोलनातून जर काही निष्पन्न झाले नाही, तर येत्या १ आॅगस्ट रोजी मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.
अलिबाग तहसीलदारांना सोमवारी आंदोलनाचे निवेदन देताना, भाजप अलिबाग शहर अध्यक्ष अंकित बंगेरा, तालुका ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ.गणेश गवळी यांनी दुधाची पिशवी देऊन आंदोलन केले.
अनुदानाची मागणी
दासगाव : गायीच्या दुधाला १० रुपये अनुदान आणि पावडरच्या दुधाला ५० रुपये अनुदान द्या, अशी मागणी महाडमधील भाजपच्या वतीने करण्यात आली. मागणी पूर्ण झाली नाही, तर आंदोलनचा इशारा दिला. या प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, महेश शिंदे, चंद्रजित पालांडे, श्वेता ताडफळे, मंजुषा कुद्रीमोती, अॅड.अदित्य भाटे आदींन महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले.