मुरुड : तालुक्यातील ७२ गावे व मुरुड शहरात गेल्या १६ दिवसांपासून वीजपुरवठा होत नसल्याने हा संपूर्ण भाग अंधारात आहे. सामान्य नागरिक या परिस्थितीला वैतागलेला असून तीव्र संताप व्यक्त करीत आहे. याच पार्श्वभूमीवर मुरुड तहसील कार्यालयात सर्वपक्षीय व त्रस्त नागरिक यांची एक सभा तहसीलदार गमन गावीत यांच्या दालनात संपन्न झाली. या वेळी संतप्त नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुरुड नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते मंगेश दांडेकर यांनी आज सायंकाळपर्यंत मुरुडमध्ये वीज न आल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यास उपस्थित नागरिकांनी पाठिंबा दर्शवून वीज मंडळाविरुद्ध रस्त्यावर उतरून अंदोलन करू, असे सर्वानुमते ठरले आहे.या वेळी अरविंद गायकर यांनी तहसीलदारांनी वीज मंडळाचा आढावा घेणे आवश्यक होते; परंतु ते लक्ष देत नसल्याने वीज मंडळाचे चांगलेच फावले आहे. येरेकर यांची बदली करा, अशी मागणी त्यांनी केली. यावर तहसीलदार गमन गावीत यांनी मी वीज मंडळाचा आढावा घेत आहे. त्यांना हेसुद्धा सांगण्यात आले आहे की, जनतेचा रोष अनावर झाला आहे. वीज लवकर आणा. ते आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. उप कार्यकारी अभियंता येरेकर यांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवून त्यांच्या बदलीची मागणी करणार असल्याचे या वेळी गावीत यांनी सांगितले.माजी नगरसेवक प्रकाश सरपाटील यांनी वीज मंडळास लागणारे मनुष्यबळ मोफत पुरविणार असल्याचे सांगून मंगेश दांडेकर यांनी लोकांच्या भावनेचा आदर करा व वीज लवकरात लवकर आणण्याची विनंती केली. या सभेस सभापती अशीका ठाकूर, ललित जैन, कुणाल सतविडकर, माजी सरपंच मुश्रत उलडे, प्रकाश सरपाटील, जाहिद फकजी आदींसह नागरिक तहसील कार्यालयात उपस्थित होते.काही भागात वीजपुरवठाया सभेत वीज मंडळाचे पेण येथील अधीक्षक अभियंता डी.आर. पाटील यांनी पाबरेपासून मुरुड येथील स्विचिंग सेंटरपर्यंत ७२ खांब पडले आहेत. शंभर लोकांचा समूह काम करीत आहे. पाबरे येथील मुख्य वाहिनीचे काम करीत असताना पिन डिस्क फेलुअर होत असल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. सध्या रिप्लेसमेंटचे काम जोरदार सुरू असून मुरुडचे स्विचिंग सेंटर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.स्विचिंग सेंटरमध्ये वीजपुरवठा प्राप्त होताच मुरुड शहरात किमान ४० टक्के भागाला आज पुरवठा होईल. तद्नंतर शहरातील दुरुस्तीच्या कामाला वेग येणार आहे. भूमिगत वाहिनीचे काम ज्या भागात झाले आहे तिथे वीज प्राप्त होणार आहे. एलटी खांब बसवण्यास स्थानिकांनी सहकार्य करावे, अशी मागणी पाटील यांनी केली.
वीजपुरवठा न झाल्यास आंदोलन; नागरिकांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 11:26 PM