खासगीकरणाविरोधात आंदोलन : जिल्ह्यातील सरकारी बँका बंद असल्याने ग्राहकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 09:11 AM2021-03-16T09:11:20+5:302021-03-16T09:11:54+5:30
शासकीय बँकांचाही खासगीकरण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. याविरोधात देशातील सर्व शासकीय बँक कर्मचाऱ्यांनी १५ व १६ मार्च असे दोन दिवस बँक बंद आंदोलन सुरू केले आहे.
अलिबाग : केंद्र सरकार फायद्यात असणारे उद्याेग, विमा कंपन्यांपाठाेपाठ आता सरकारी बँकांचेही खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या धाेरणाला विराेध करण्यासाठी देशातील सर्व सरकारी बँका १५ आणि १६ मार्च राेजी बंदची हाक दिली आहे. त्याला पहिल्याच दिवशी रायगड जिल्ह्यातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील सरकारी बँका बंद असल्याने ग्राहकांचे मात्र चांगलेच हाल झाो. खासगी बँकांचे व्यवहार सुरळीत सुरू हाेते.
शासकीय बँकांचाही खासगीकरण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. याविरोधात देशातील सर्व शासकीय बँक कर्मचाऱ्यांनी १५ व १६ मार्च असे दोन दिवस बँक बंद आंदोलन सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यातील २७० बँक शाखा दोन दिवस बंद राहणार असून पाच हजार अधिकारी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सोमवारी अलिबाग येथील युनियन बँकेसमोर या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
खातेदार आपली जमवलेली पुंजी ही सेव्हिंग, फिक्स डिपॉझिट खात्यात ठेवत असतो. अनेक खासगी बँका या आर्थिक घोटाळ्यामुळे बंद झाल्या आहेत. त्यामुळे शासकीय बँकेवर आजही ग्राहकांचा विश्वास आहे. त्यामुळे या बँका आजही ग्राहकांप्रति आपला विश्वास टिकून आहेत. मात्र केंद्र सरकार आता या शासकीय बँकेचे खासगीकरण करत आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेला बँक अधिकारी, कर्मचारी यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे बँक अधिकारी, कर्मचारी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत.
रायगड जिल्ह्यातील २७० बँकेच्या शाखा १५ व १६ मार्च असे दोन दिवस बंद राहणार आहेत. या शाखेतील पाच हजार अधिकारी, कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन, एआयबीओसी, एआयबीइए या बँक संघटनेने हे आंदोलन पुकारले आहे. दोन दिवस बँक बंद राहणार असल्याने याचा फटका हा ग्राहकांना बसणार आहे. केंद्र सरकारच्या विरोधात अलिबाग युनियन बँकेसमोर बँक अधिकारी, कर्मचारी यांनी निदर्शने करून घोषणाबाजी केली आहे.
खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा परिणाम पनवेलमध्ये दिसून आला. दरम्यान, कोरोनामुळे आंदोलन आणि निदर्शने करण्यास बंदी असल्याने कर्मचाऱ्यांकडून शाखांसमोर गटागटांत घोषणाबाजी करण्यात येत आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका ग्राहकांना -
- तळा : बँक कर्मचाऱ्यांनी बँकेच्या खासगीकरणा विरोधात पुकारलेल्या संपाचा फटका ग्राहकांना बसला आहे. १३ मार्च रोजी दुसरा शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्टी व त्यानंतर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस संपामुळे बँका बंद असल्याने सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. याचा फटका बँकेच्या ग्राहकांना बसला असून बँकेतून पैसे काढता येत नसल्याने दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे कोठून आणायचे या विवंचनेने नागरिक हैराण झाले आहेत.
- शनिवार व रविवार सुट्टी असल्याने सोमवारी नागरिकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली. मात्र सोमवार व मंगळवार असे दोन दिवस संपामुळे बँक बंद असल्याचे समजल्याने बाजारात खरेदीसाठी पैसे कोठून आणायचे हा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला.
- बँक बंद असली तरी बँकेने एटीएम सेवा सुरू ठेवली होती. यामुळे सुशिक्षित नागरिकांची अडचण दूर झाली. मात्र तळा हा दुर्गम तालुका असल्याने तसेच तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिकांना एटीएमचे ज्ञान नसल्याने पैशांअभावी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
- शिमगा जवळ आल्याने मुंबईतील चाकरमानी शिमग्याला मोठ्या संख्येने गावाकडे परतत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी गावाकडचे नागरिक आपल्या घरात सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदी करून ठेवतात. यामुळे तळा बाजारपेठेत सोमवारी तालुक्यातील नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली; मात्र संपामुळे सरकारी बँका बंद असल्याकारणाने पैशांअभावी नागरिकांना रिकाम्या हाताने आपल्या घरी परतावे लागले.