पनवेल : करंजाडे नोड वसविल्यापासून येथील रहिवाशांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे येथील रहिवाशांना विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत असल्याने संतप्त रहिवाशांनी करंजाडे पीपल्स फाऊंडेशनच्या माध्यमातून १८ जून रोजी जेएनपीटी महामार्ग रोखण्याचा निर्धार केला होता. मात्र पोलिसांनी आंदोलकांना करंजाडे शहरातच रोखून धरले. तसेच सिडको अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले.
करंजाडे नोड मध्ये जवळपास दीड लाख रहिवाशी वास्तव्यास आहेत. सामान्य नोकरदार वर्ग असलेल्या येथील रहिवाशांना अपुऱ्या पाण्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यात सिडको प्रशासनाला जाग येत नसल्याने येथील रहिवाशांनी करंजाडे नोडला लागून असलेल्या जेएनपिटी मार्गाला रोखून ठेवून प्रशासनाला जाग आणण्याचा आंदोलनाचा निश्चय केला होता. मात्र पोलिसांनी आंदोलकांना थांबविले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व विनोद साबळे यांनी केले. त्यांनी सिडको समोर काही मागण्या ठेवल्या होत्या. यामध्ये सेक्टर ५,६ हिल साईड सोसाट्यांचे पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी उभारावी, शट डाऊन काळात रहिवाशांना पर्यायी पाणी पुरवठा करावा, करंजाडे शहरासाठी धरणाचे पाणी आरक्षित करावे, पाणी समस्येबाबत माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरु करावी, सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी राहुल सरोदे यांची याठिकाणाहून बदली करावी अशा स्वरूपाच्या मागण्यांचा समावेश होता. यापैकी बहुतांशी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी लेखी पत्राद्वारे दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
करंजाडे वासियांच्या पाणीपुरवठ्याबाबत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन आम्हाला सिडकोने दिले असल्याने हे आंदोलन आम्ही स्थगित केले आहे. सिडकोने दिलेले आश्वासन न पाळल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र असेल.विनोद साबळे (आंदोलनकर्ते ,करंजाडे पीपल्स फाऊंडेशन )