कृषी माल कमी खर्चात, वेळेत होणार निर्यात; जेएनपीएत २७ एकरावर प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 08:09 AM2024-02-14T08:09:38+5:302024-02-14T08:09:59+5:30

२८४.१९ कोटींची गुंतवणूक

Agricultural goods will be exported at low cost, on time; Project on 27 acres in JNPT | कृषी माल कमी खर्चात, वेळेत होणार निर्यात; जेएनपीएत २७ एकरावर प्रकल्प

कृषी माल कमी खर्चात, वेळेत होणार निर्यात; जेएनपीएत २७ एकरावर प्रकल्प

उरण : देशभरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत सहजपणे निर्यात करण्यासाठी निर्यातभिमुख कृषी प्रक्रिया आणि साठवणूक सुविधेसाठी डीबीएफओटी मॉडेलमधील ॲग्रो प्रोसेसिंग आणि  स्टोरेज युनिट प्रकल्प उभारण्याची तयारी जेएनपीएने सुरू केली आहे. उरण येथील जेएनपीएच्या मालकीच्या २७ एकर क्षेत्रावर २८४.१९ कोटींच्या या प्रकल्पाला बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत मंजुरीही मिळाली आहे. पीपीपी तत्त्वावर उभारणाऱ्या या प्रकल्पाचा अहवाल अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठविल्याचे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

भारतातून  प्रामुख्याने चहा, कॉफी, तांदूळ, गहू, कापूस, तंबाखू, मसाल्याचे पदार्थ, तेलबिया, फळे, फुले, भाजीपाला, सागरी उत्पादने, साखर, मांस व कातडी, काजू आदी कृषीमालाची निर्यात केली जाते. देशातील शेतमालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. संख्या मोठी असली तरी शेतकरी विखुरलेले आणि असंघटित आहेत; परंतु खरेदीदार संघटित आहेत, त्यांचे मोठे शोषण होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे हाेणारे शोषण राेखण्यासाठी जेएनपीएने डीबीएफओटी मॉडेलमधील ॲग्रो प्रोसेसिंग आणि स्टोरेज युनिट प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली आहे. 

प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे
शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत सहजपणे निर्यात करता येणार असल्याने त्यांचा आर्थिक नफा वाढण्यास मदतच होणार आहे. निर्यातदार आणि आयातदारांनाही फायदेशीर आहे. निर्यात-आयात वाहतूक वाढवण्याच्या जेएनपीएच्या भूमिकेला तो चालना देणारा असून ३० वर्षांच्या डीबीएफओटी मॉडेलमधील हा प्रकल्प जेएनपीएला जमीनभाडे तसेच महसूलही देणारा आहे. बोर्ड ऑफ ट्र्स्टींच्या मंजुरीनंतर तो केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती जेएनपीए कामगार ट्र्स्टी रवींद्र पाटील यांनी  दिली.

Web Title: Agricultural goods will be exported at low cost, on time; Project on 27 acres in JNPT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.