दासगाव : उशिराने परंतु दमदार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी लावणीची कामे मागे पुढे का होईना पूर्ण केली. या दरम्यान पाऊस अधूनमधून चांगलाच बरसत होता. त्यामुळे भातपीकही जोमाने वाढू लागले होते. आता १२५ दिवसांच्या भातपिकाला दाणे धरू लागले असताना पाऊस कमी झाल्यामुळे या भातपिकावर करपा, खोडकिडा, तुरतुरा, अन्य रोग पडल्याचे दिसून आल्याने हातातोंडाशी आलेले पीक निसटण्याची शक्यता दिसून येत असल्याने शेतकरी हादरला आहे.जून-जुलै महिन्यात दरवर्षीप्रमाणे पाऊस पडला नसला तरी भातपिकासाठी आवश्यक असणारा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे जुलैच्या पंधरवड्यापर्यंत भातपिकाच्या लावणीचे काम आटोपले होते. यानंतर दीड महिन्यात भात पिकाला आवश्यक असणारा पाऊस अधूनमधून योग्य पध्दतीने पडल्यामुळे पीकही शेतामध्ये डोलू लागले. भाताच्या लोंब्यांमध्ये दाणेही दिसू लागले, अशा परिस्थितीत मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतीमध्ये साचलेले पाणी तसेच हवामानातील बदल व ढगाळ वातावरण हे शेतीला पोषक नसल्याने करपा रोग, खोडकिडा, तुरतुरा, लष्करी अळी या रोगाची लागण लागण्याचे आढळून आल्याने महाड तालुक्याच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. यावर उपाययोजना म्हणून कृषी विभागाचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पाऊस थांबल्याने शेतीसाठी हे हवामान पोषक नाही. तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतीची पाहणी केली असता खोडकिडा, तुरतुरा, करपा, या रोगांची लागण शेतीला झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आणखी काही दिवस पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर आणखी नवीन रोग लष्करी अळी ही सुरूवात होईल. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत.- एस.पी. गोगटे, कृषी अधिकारी
हवामानात बदलामुळे शेती धोक्यात
By admin | Published: September 07, 2015 11:59 PM