कृषी विभागाने गेल्या वर्षभरात बांधले 756 वनराई बंधारे
By निखिल म्हात्रे | Published: May 31, 2024 02:15 PM2024-05-31T14:15:58+5:302024-05-31T14:16:42+5:30
या पाण्याचा जिल्ह्यातील 1426 हेक्टरवरील शेती व आजूबाजूच्या परिसराला लाभ झाला आहे.
निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - रायगड जिल्हयाच्या कृषी विभागाने गेल्या वर्षात एकूण 756 वनराई बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यांमुळे 1788 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. या पाण्याचा जिल्ह्यातील 1426 हेक्टरवरील शेती व आजूबाजूच्या परिसराला लाभ झाला आहे.
जिल्ह्यात पावसाला संपता संपताच पाण्याची टंचाई जाणवू लागते. पाण्याचे दुर्भिक्ष्य हे माणसासह प्राणी-पशुपक्षी आणि संपूर्ण परिसरावर परिणाम करते. यावर वनराई बंधारे ही संकल्पना प्रभावी ठरते. या वनराई बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास लाभ होतो. नाला किंवा ओढा यातील पाणी स्थानिक पातळीवर उपलब्ध होते. उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत तळ गाठतात. त्यामुळे वनराई बंधारे शेतकर्यांसह पशु-पक्ष्यांसाठी वरदान ठरत ठरतात.
वाहत्या पाण्याच्या ठिकाणी सिमेंटच्या गोणींमध्ये माती भरुन बंधार्यांची निर्मिती केली तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊन यातून पुढील अनेक दिवस गुराढोरांची तहान भागविली जाऊ शकते. त्याचप्रमाणे शेतकर्यांना शेती करणेदेखील सोयीचे होऊन त्यातून चांगली पिके घेता येतात.
गेल्या काही वर्षात गाव पातळीवर बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबविली जात आहे. यामुळे वनराई बंधारे शेतकरी आणि पशु-पक्षांसाठी वरदान ठरत आहेत. पावसाळा संपताच पाण्याचे विविध स्त्रोत्र तळ गाठत असतात. मात्र, काही ठिकाणी हेच पाणी आपल्यासाठी मोठे वरदान ठरत आहे.
बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो, म्हणून यास वनराई बंधारा महटले जाते. बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू, दगड यांच्या साहाय्याने बांध घालून पाणी अडविता येते. यासाठी फारसा खर्च येत नाही. या बंधायामुळे जनावरे, पक्षी, जंगली प्राणी यांची तहान भागविण्यासाठी मोलाची मदत करणार आहे. यामुळे महत्त्व जाणून घेऊन बंधारा बांधून पाणी अडविले पाहिजे. यासाठी ग्रामपंचायतीने लक्ष घालून ही संकल्पना राबविणे महत्त्वाचे आहे.
रायगड जिल्हयाच्या कृषी विभागातर्फे अलिबाग तालुक्यात 73 बंधारे बांधले असून त्यातून 80 टीसीएम, पेण तालुक्यात 58 बंधारे बांधले असून त्यातून 145 टीसीएम, खालापूर तालुक्यात 39 बंधारे बांधले असून त्यातून 97 टीसीएम, पनवेल तालुक्यात 48 बंधारे बांधले असून त्यातून 120 टीसीएम, कर्जत तालुक्यात 213 बंधारे बांधले असून त्यातून 532 टीसीएम, उरण तालुक्यात 27 बंधारे बांधले असून त्यातून 67.50 टीसीएम, माणगाव तालुक्यात 102 बंधारे बांधले असून त्यातून 255 टीसीएम, रोहा तालुक्यात 32 बंधारे बांधले असून त्यातून 80 टीसीएम, तळा तालुक्यात 21 बंधारे बांधले असून त्यातून 52 टीसीएम, सुधागड तालुक्यात 37 बंधारे बांधले असून त्यातून 92 टीसीएम, महाड तालुक्यात 24 बंधारे बांधले असून त्यातून 60 टीसीएम, पोलादपूर तालुक्यात 16 बंधारे बांधले असून त्यातून 35 टीसीएम, म्हसळा तालुक्यात 14 बंधारे बांधले असून त्यातून 35 टीसीएम, श्रीवर्धन तालुक्यात 16 बंधारे बांधले असून त्यातून 40 टीसीएम असा एकूण सुमारे 1788 टीसीएम पाणी साठा उपलब्ध झाला आहे.
कर्जत तालुक्यातील वनराई बंधाऱ्यांसाठी येथील सामाजिक संस्थांचे चांगले सहकार्य मिळत आहे. तसेच वनराई बंधाऱ्यांच्या पाण्यामुळे येथे भाजीपाल्याचे पिक घेतले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही वनराई बंधाऱ्यांचे महत्व कळले असून शेतकऱ्यांचेही त्यास चांगले सहकार्य मिळते. येथील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एनजीअो आणि शेतकऱ्यांच्या मदतीने बनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. - अशोक गायकवाड, कृषी अधिकारी, कर्जत.