नांदगाव : रायगड जिल्ह्यात गेले पंधरा दिवस सतत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे भातशेती लावणीचा हंगाम जोरात आहे. मात्र लहरी हवामान, मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांना खर्चाच्या व मेहनतीच्या मानाने शेती परवडेनाशी झाली आहे.एखाद्या भातशेतीचे जर १ खंडी म्हणजेच ८०० ते १००० किलो भात पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना तेवढाच आठ दहा हजारांचा खर्च होतो. भात पेरणीपासून शेतकऱ्यांना चार ते पाच नांगर जमीन नांगरणीसाठी लागतात. सध्या एका नागराला दिवसाला ६०० रुपये द्यावे लागतात. किमान अडीच हजारांचा खर्च होतो. ट्रॅक्टर चालकही एका तासाचे चारशे ते पाचशे घेतो. नांगरापेक्षा त्याला जादा खर्च येतो, असे शेतकरी सांगतात. भात पेरणीपासून बारा पंधरा मजूर लागतात. त्यांच्या मजुरीचा दर पुरुषाला २५० रुपये तर स्त्रीला २०० रुपये आहे. शिवाय मळणीचे दर वेगळे असतात. सकाळी न्याहारी, दुपारी जेवण व संध्याकाळी पोस्त द्यावा लागतो. तण काढणे, खते, औषधे व राखणीसाठीही पैसे मोजावे लागतात.जाड्या भाताला एका मणासाठी ३०० ते ४०० रुपये मिळतात. तर बारीक भाताला एक मणासाठी ४०० रुपये ते ६०० चा भाव मिळतो. त्यामुळे भात पिकाच्या उत्पादनासाठी जेवढा खर्च होतो तेवढ्याच खर्चाचे पीक येते. पाऊस व्यवस्थित पडला तर ठीक अन्यथा शेतकरी तोट्यात जाते. त्यामुळे अलीकडे शेतकरी शेती करायला मागत नाहीत. एखाद्या जमीन मालकाची शेती दुसऱ्या शेतकऱ्याने कसण्यास घेतली तर पूर्वी येणाऱ्या पिकाचे दोन समान वाटे केले जायचे त्यास ग्रामीण शेतकरी अरदल असे म्हणतात. पण आता मात्र चार वाट्यांपैकी तीन वाटे कसणारा घेतो व फक्त एक वाटा मालकाला मिळतो. परिणामी बऱ्याच जमीन मालकांनी आपली जमीन ओसाड टाकली आहे किंवा ओसाड जावू नये म्हणून काहीही मोबदला न देता जमीन पिकवा या निर्णयापर्यंत मालक आले आहेत, तर काहींनी आपली शेतीच विकली आहे. (वार्ताहर)
मजुरी वाढल्याने शेती झाली परवडेनाशी
By admin | Published: July 16, 2016 2:02 AM