ऐन दिवाळीत फटाके व्यवसायात मंदीची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 12:20 AM2020-11-04T00:20:56+5:302020-11-04T00:21:17+5:30
Diwali : या सणावारांच्या वेळेस काेणी पणत्या, दिवे, फराळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाेभेचे व आतषबाजीचे फटाके यांचा व्यवसाय करतात.
माणगाव : भारतासह महाराष्ट्रात आलेल्या कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यातील अनेकांचे उद्योगधंदे बुडाले, शासनाकडून टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या अनलाॅकमुळे व्यापारी वर्ग तर सुखावला. मात्र, आर्थिक कुंचबणेमुळे ग्राहक संख्येत मात्र घट झाली अशातच दसऱ्यानंतर दिवाळी आली. मात्र, या वर्षी फटाके बाजारात मंदी दिसते आहे.
या सणावारांच्या वेळेस काेणी पणत्या, दिवे, फराळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाेभेचे व आतषबाजीचे फटाके यांचा व्यवसाय करतात. मात्र, दरवर्षीप्रमाणे फटाके खरेदीकरिता असणारा उत्साह मात्र या वर्षी कुठेच दिसून येत नसल्याचे माणगांवातील बहुसंख्य किरकाेळ व घाऊक फटाके विक्रेत्यांचे म्हणणे आहे, अशातच एकामागाेमाग शेतीवर येणाऱ्या संकटामुळे काेकणी शेतकरीही हैराण झाल्यामुळे या वर्षी दिवाळी साजरी करावी की नाही, या संभ्रमात नागरिक असल्याचे दिसत आहे.
दरवर्षी दिवाळीच्या पूर्व आठवड्यात ग्राहकांची फटाके खरेदी करण्याकरिता ओढ असायची. मात्र, या वर्षी खुद्द फटाक्यांच्या घाऊक व्यापाऱ्यांना ग्राहकांची वाट पाहत बसण्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीत सर्व गाेष्टी पाहता या वर्षी फटाका व्यावसायिकांवरही मंदीचे सावट असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरवर्षीप्रमाणे फटाक्यांना ग्राहक पसंती देत नसल्याचे चित्र आहे. दरवर्षी या आठवड्यात आमच्या हाेलसेल विक्रेत्याकडेही लाइन लागलेली असते. मात्र, या वर्षी अशी परिस्थिती कुठेच दिसून आली नाही. तरीदेखील आम्ही फटाके ग्राहकांना परवडतील अशाच किमतीत ठेवले आहेत.
- शिल्पा पटवा-राजपूरकर,
फटाके विक्रेते
माणगांव