महाड एमआयडीसीत हवाप्रदूषण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 01:03 AM2019-11-09T01:03:50+5:302019-11-09T01:04:46+5:30
दुर्गंधीने नागरिक हैराण : बसवण्यात आलेली यंत्रणा कालबाह्य
सिकंदर अनवारे
दासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रातील जलप्रदूषण थांबण्याचे नाव घेत नसून, आता मात्र नगरिकांना वायुप्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. सध्या महाड औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होत असून यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. वायुप्रदूषण मोजणारी यंत्रणा ज्या ठिकाणी बसवण्याची गरज आहे त्या ठिकाणी न बसवता वेगळ्या ठिकाणी बसवली आहे. परिसरातील गाव आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना वायुप्रदूषणाचा फटका सहन करावा लागत आहे. या वायुप्रदूषणावर नियंत्रण कोण आणणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुरू होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोणते कारखाने वायुप्रदूषण करतात याची छाननी केली. मात्र, त्यांच्याही हाती काही लागले नाही.
महाड औद्योगिक क्षेत्रात बहुतांश कंपन्या या रासायनिक उत्पादन करणाºया आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून एमआयडीसीमधील जल आणि जमीन प्रदूषण कायम वादाचा विषय बनला आहे. याबाबत अनेक कंपन्यांना बंदच्या नोटिसाही देण्यात आल्या आहेत. महाडमधील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी मुळातच आंबेत खाडीत सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, हे पाणी सुरुवातीला सव आणि त्यानंतर ओवळे गावाजवळ सोडण्यात आल्याचे आढळून आले आहे. या रसायन मिश्रीत पाण्यामुळे महाड खाडीपट्टा आणि बिरवाडी परिसरातील गावातील जमीन आणि पिण्याचे पाणी प्रदूषित झाले आहे. एकेकाळी जागतिक यादीच्या डर्टी-थर्टीमध्ये महाड औद्योगिक क्षेत्राचा समावेश झाला होता. त्यानंतर बरेच बदल करून हे नाव आता वगळण्यात आले असले तरी आजही अनेक कारखाने आपले पाणी ऐन पावसाळ्यात सोडून देण्यात मागेपुढे पाहत नाहीत. जलप्रदूषण आणि भूप्रदूषण याकडे पाहताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मात्र हवाप्रदूषणाकडे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत महाडमध्ये बसवण्यात आलेली यंत्रणाही कालबाह्य झालेली असून या माध्यमातून केवळ हवेतील सल्फर आणि नायट्रोजन हेच घटक मोजले जात आहेत.
ज्या एजन्सीला हे काम देण्यात आले आहे त्या एजन्सीकडून मात्र हवेत घातक घटक नसल्याचा अहवाल दिला जात असल्याने, ऐन हिवाळ्यात हवेत दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांतून याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
धूळ जमा करणारे यंत्र बसवले
महाड एमआयडीसीमध्ये धूळ जमा करणारे डस्ट संप्लर बसवण्यात आले आहेत. या यंत्राने हवेतील धूळ गोळा करून यातील सल्फर आणि नायट्रोजनचे घटक मोजले जात आहेत. पीपीएल, अग्निशमन केंद्र आणि पाणी शुद्धीकरण केंद्र या तीन ठिकाणी हे यंत्र बसवण्यात आले आहेत.
या तिन्ही ठिकाणी धुळीचा किंवा वायुप्रदूषणाचा त्रास जाणवत नाही, अशा ठिकाणी हे यंत्र बसवण्यात आले आहेत. स्थानिक प्रदूषण नियंत्रण कमिटीच्या शिफारशीनुसार हे यंत्र बसवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला निरीक्षण करण्याचे काम देण्यात आले.
या एजन्सीने १ ते ३० सप्टेंबर या कालवधीत हवा शुद्ध असल्याचा अहवाल दिला आहे. यामुळे नागरिकांमध्ये या निरीक्षणाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हवेतील दुर्गंधीवरून कोणत्या कंपनीचा वायू हवेत मिसळला आहे हे शोधणे कठीण असल्याचे मत महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केले आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रातील जलप्रदूषणाचा फटका नागरिकांसह माशांनादेखील बसला आहे. अनेक मासे मृतावस्थेत साडपल्याच्या घटना घडल्या आहेत.
हवाप्रदूषणाबाबत जुलै महिन्यात हाटर््स अॅर्गाेनिक आणि अशोक अल्को केम या दोन कंपन्यांना अंतरिम निर्देश, नोटीस देण्यात आल्या होत्या. हवेतील दुर्गंधीतून कंपनी शोध घेणे कठीण असून, सध्या अस्तित्वात असलेली यंत्रणाही कालबाह्य झालेली आहे. यामुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या पी.एम.१० आणि पी.एम.२.५ या नव्या यंत्रातून अचूकपणा अधिक प्रभावीपणे शोधणे शक्य आहे. आम्ही तो शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
- सा. वि. औटी, उपप्रादेशिक अधिकारी,
प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड.
गेले काही दिवस हवेत दमटपणा असून हवेत सोडण्यात येणारे वायू सकाळी आणि संध्याकाळी काही विशिष्ट उंचीवर धुक्यात मिसळून नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. जवळपासच्या गावातही हा त्रास जाणवत आहे.
- करीम करबेलकर, नागरिक