महाडमधील केमिकल कंपनीत वायुगळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:38 AM2018-04-09T05:38:27+5:302018-04-09T05:38:27+5:30
महाड औद्योगिक वसाहतीमधील सानिका केमिकल्समधून शनिवारी रात्री झालेल्या वायुगळतीमुळे एका दुचाकीस्वार तरुणाला विषारी वायूची बाधा झाली.
महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील सानिका केमिकल्समधून शनिवारी रात्री झालेल्या वायुगळतीमुळे एका दुचाकीस्वार तरुणाला विषारी वायूची बाधा झाली. त्याच्यावर महाड येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर या कारखान्यावर संतप्त जमावाने दगडफेक करीत रोष व्यक्त केला.
शनिवारी रात्री सानिका केमिकल्समधील ब्लोअर लिक झाल्याने विषारी वायू बाहेर पडला. धुराच्या स्वरूपातील त्याचे लोळ रस्त्यावर आल्याने रस्त्यावरून जात असलेला सचिन कुशा जाधव (३५) हा तरुण बेशुद्ध पडला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
यासंदर्भात सानिका केमिकल्समधील प्लँट इन्चार्ज जाधव यांच्याकडे विचारणा केली असता, आठ वाजण्याच्या सुमारास ही वायुगळती झाल्याचे आणि अर्ध्या तासातच त्यावर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.