वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : पनवेलमधील ज्या गावांच्या बलिदानाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहिले आहे. त्यात १० गावे कायमस्वरूपी विस्थापित झाली असून अशा गावांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या लोकनेते दि. बा. पाटील २७ गाव कृती समितीने मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मतदानात नोटाचा वापर करण्याचा इशारा दिला आहे.
आम्ही दिबांच्या नावासाठी भांडत असताना राजकारण दिबांच्या नावाने सुरू असल्याने या मतदानप्रक्रियेत नोटाचे बटन दाबून आम्ही या निवडणुकीत कोणालाही पसंती देणार नसल्याचे कृती समितीचे प्रवक्ते ॲड. विक्रांत घरत यांनी स्पष्ट केले. विमानतळाला दि.बां.चे नाव देण्यासाठी जी समिती कार्यरत आहे. तिची भूमिकाही संशयास्पद असल्याने आम्ही तिचा निषेध करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येकवेळी घाटावरील उमेदवार कशासाठी?
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेला जवळपास २० वर्षे होत आली आहेत. आजवर एकही प्रमुख पक्षाने पनवेल, उरण तसेच कर्जतचा उमेदवार दिला नसल्याने आजवर केवळ घाटमाथ्यावरील उमेदवारच मावळचे प्रतिनिधित्व करीत आले आहेत. त्यामुळे आपोआपच घाटाखालील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु होती.