आजी-माजी नगरसेवक रिंगणात
By admin | Published: May 14, 2017 10:48 PM2017-05-14T22:48:13+5:302017-05-14T22:48:13+5:30
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी नगरपालिकेतील आजी-माजी नगरसेवक रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक प्रभागात आजी-माजी असे एक ते दोन
मयूर तांबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी नगरपालिकेतील आजी-माजी नगरसेवक रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक प्रभागात आजी-माजी असे एक ते दोन लोकप्रतिनिधी निवडणूक लढवत आहेत. काही प्रभागांत दोन विद्यमान नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने त्यांच्यात अटीतटीची लढत पहावयास मिळणार आहे. २९ गावांचा समावेश महापालिकेत झाल्याने काही प्रभागात जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सदस्य देखील महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पनवेल महापालिका निवडणुकीच्या रिंगणात जवळपास २८ ते ३० आजी-माजी नगरसेवक उतरले आहेत. पूर्वी पनवेल नगरपालिकेत दहा प्रभागात ३८ नगरसेवक व ४ स्वीकृत असे ४२ नगरसेवक होते. नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्याने व आजूबाजूच्या २९ गावांचा महापालिकेत समावेश झाल्याने नवीन प्रभाग रचनेनुसार आता महापालिकेचे वीस प्रभाग झाले आहेत. महापालिकेच्या निवडणूक रिंगणात या वेळी तब्बल २८ हून अधिक आजी-माजी नगरसेवक उतरले आहेत. मागील निवडणुकीत आरक्षणामुळे तर काहींचे पत्ते पक्षाकडून कापले गेल्यामुळे त्यांची नगरसेवक बनण्याची संधी हुकली होती. परंतु आता नव्या प्रभाग आरक्षणामुळे तसेच भाजपा व शिवसेना यांची युती न झाल्यामुळे अनेकांना संधी मिळाली आहे. तर शेकाप, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात आघाडीझाल्यामुळे अनेक आजी- माजी नगरसेवकांना निवडणूक लढण्यास मिळाली नाही.
महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जवळपास २८ आजी-माजी नगरसेवकांनी उडी घेतली आहे. महापालिका निवडणुकीसाठी शेकाप, शिवसेना, भाजपा, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांकडून माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवकांवर मतदार पुन्हा एकदा विश्वास दाखवून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देतील, असा विश्वास पक्षाच्या प्रमुखांना वाटत आहे. नगरसेवक प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या रिंगणात असून माजी नगरसेवकांसह माजी नगराध्यक्ष देखील आपले नशीब आजमावत आहेत. यात संदीप पाटील, चारु शीला घरत यांचा समावेश आहे. प्रभाग २० मधून माजी नगरसेवक पती, पत्नी आपले नशीब पुन्हा आजमावत आहेत.
महापालिका निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या प्रमुख पाचही पक्षांसह छोटे-मोठे पक्ष देखील स्वतंत्र निवडणुकीत उतरल्यामुळे विद्यमानांसह माजी नगरसेवकांना तिकिटासाठी फारसे झगडावे लागले नाही. पक्ष बदलला तरीही कुणा न कुणा पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. अपवाद वगळता बहुतांशांना तिकीट मिळाले आहे त्यामुळे काही विद्यमान नगरसेवकांनी स्वत: होऊन या निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे पहावयास मिळत आहे. प्रभागांच्या आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांच्या कारकिर्दीला यंदा ‘ब्रेक’ लागला आहे, तर काही माजी नगरसेवक या महापालिकेच्या निवडणुकीत कमबॅक करत आहेत.