राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : बारामती मध्ये शिवतारे यांची ताकद सुनेत्रा पवार यांच्या मागे शंभर टक्के उभी राहणार आहे. विजय शिवतारे यांच्या मनातील शंका कुशंका ह्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दूर केल्या आहेत. त्यामुळे शिवतारे हे सुनेत्रा पवार यांच्या बाजूने प्रचार करतील. निलेश लंके याना लोकसभेची स्वप्न पडू लागली आहेत. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असून यासाठी त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल अन्यथा पक्षांतर बंदी कायद्याने त्यांच्यावर कारवाई करू अशी प्रतिक्रिया रायगड लोकसभेचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. नाशिक येथील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यानंतर तेथील परिस्थितीवर बोलेल असेही तटकरे म्हणाले आहेत.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी रेवदंडा येथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सुनील तटकरे यांनाही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रेवदंडा येथे पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्याच्या निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.
नाशिक, बारामती, अहमदनगर लोकसभा मतदार संघातील राजकीय परिस्थितीबाबत सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली. बारामती लोकसभा मतदार संघात आमदार विजय शिवतारे यांचे बंड शमले असले तरी प्रचारात उतरले नसल्याबाबत तटकरे यांना विचारले असता, कालच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली आहे. शिवतारे यांच्या मनातील असलेल्या शंका कुशंका यांचे निरसन करण्यात आले आहे. त्यामुळे एक दोन दिवसात ते प्रचारात उतरून त्यांची संपूर्ण ताकद सुनेत्रा पवार यांच्या मागे लावतील असा विश्वास तटकरे यांनी बोलून दाखवला आहे. निलेश लंकेना लोकसभेचे वेध
निलेश लंके याना लोकसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभेचे स्वप्न पडत असल्याने त्यांनी निर्णय घेतला असेल. सात आठ महिन्यात अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांची सहमती होती. त्याच्या मतदार संघात हजारो कोटीची विकासकामे झाली आहेत. लंके याना विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल अन्यथा त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याने कारवाई करू. अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी आहे अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यावर सविस्तर बोलणार
नाशिक लोकसभा मतदार संघात छगन भुजबळ यांना स्वपक्षातून आणि मनोज जरांगे यांचा विरोध आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाशिक जागेबाबत दोन दिवसात निर्णय होईल. वेगवेगळ्या प्रतिक्रिया असू शकतात जागा वाटप झाल्यावर सखोल बोलेले. छगन भुजबळ हे गेली चाळीस, पन्नास वर्ष राजकारणातील महत्वाचे नेते आहेत. मंडल कमिशन अंमल बजावणी साठी त्यांचा मोठा संघर्ष आहे. ओबीसी न्याय हक्कासाठी राज्यासह देशभरात लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. नाशिक ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर त्यावर तपशील वार बोलेल असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.