निखिल म्हात्रे - अलिबाग : दरवर्षी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त मिळावा म्हणून आतुरतेने वाट पहात असलेले वधू-वराचे पिता यावर्षी हा मुहूर्त टाळताना दिसत आहेत. जिल्हाभरातील जवळपास सव्वाशेपेक्षा जास्त विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी अकय्य तृतीया हा एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते. लग्न समारंभ, वास्तुपूजन, धार्मिक पूजा, नामकरण विधी, नवीन दुकानाचे उद्घाटन आदींसह विविध महत्त्वाच्या कामांची सुरुवात या दिवशी केली जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्याला प्रशासनाने वेगळी नियमावली लावली आहे. केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत व कोविडचे नियम पाळून दोन तासांच्या आत लग्नकार्य आटपावे लागत आहे. जिल्ह्यात कोविड नियमांचे पालन करून काही गावात लग्नकार्य करण्यात आली आहेत.लग्न सोहळ्यांमध्ये वधू-वर मंडळींकडून वारेमाप खर्च होत असतो. त्यामुळे आता २० माणसात लग्न सोहळे पार पडत असल्याने खर्चही कमी झाला आहे. तसेच कोरोना विषाणूचे सावट अधिक बळावत असल्याने यावर्षी कोरोनामुळे सर्वच समाजाच्या विवाह सोहळ्यांना पूर्णतः ब्रेक लागला आहे.
नियमांचा अडसर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून रीतसर परवानगी मागावी लागत आहे. वधू-वरांना तहसील कार्यालयात आवश्यक ते दस्तावेज सादर करून अर्ज करून परवानगी घ्यावी लागत आहे. यात कोणत्या गावातील किती नातेवाईक उपस्थित राहतील, याची माहिती द्यावी लागते.
मे महिन्याच्या अखेरपर्यंत संसर्ग कमी होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन लाॅकडाऊन संपल्यावर जून ते जुलै महिन्यात आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे. लग्नकार्य जुळून आलेल्या संबंधित कुटुंबांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे.- सुधीर पाटील, वधू पिता
लग्न जुळल्यावर किती दिवस प्रतीक्षा करायची, असे म्हणत अनेक वधू - वर विवाह बंधनात अडकले आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत १०० वर विवाह सोहळे पार पडले आहेत. यातील बहुतांश लोकांनी मंगल कार्यालयाऐवजी घरीच हे सोहळे आटोपले आहेत.- दीपक भगत, वरपिता
कार्यालयांचे गणित बिघडले मर्यादा आल्याने मंगल कार्यालय व्यवसायावर परिणाम झाला आहे. २५ लोकांसाठी कार्यालय बुक करणे वर-वधूच्या कुटुंबीयांना परवडत नाही. घरच्या घरी विवाह कार्य पार पाडले जात आहेत.