जिल्ह्यात ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 12:55 AM2019-09-04T00:55:19+5:302019-09-04T00:55:48+5:30
दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप : १२ सार्वजनिक तर २५ हजार ४०३ गणेशमूर्तींचे विर्सजन
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये सोमवारी एक लाख एक हजार ६०२ गणेशमूर्तींचे जल्लोषात आगमन झाले होते. बाप्पाच्या आगमनाने वातावरण चांगलेच भक्तिमय झाले होते. दीड दिवसांच्या मुक्कामाला आलेल्या बाप्पाला मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. बाप्पाचा जयघोषाला टाळ, मृदुंगाचा चांगलाच साज भक्तांनी चढवला होता. दीड दिवसांचे १२ सार्वजनिक, तर २५ हजार ४०३ खासगी बाप्पाच्या मूर्तींचे समुद्र, तलाव, नदी या ठिकाणी विसर्जन करण्यात आले.
सोमवारी गणरायाच्या आगमनाने जिल्ह्यातील वातावरणात चांगलाच जल्लोष निर्माण झाला होता. अबालवृद्धांनी बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला कोणतीच कसर ठेवली नव्हती. पूजा, आरती, प्रसाद, नाचगाणी, नवीन कपडे यामध्ये ते तल्लीन झाल्याचे दिसत होते. सोमवारी जल्लोषात बाप्पाचे स्वागत के ल्यानंतरमंगळवारी आपल्या दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार असल्याची हुरहूर त्यांच्या मनात घर करून होती. त्यामुळे त्यांचे मन सुन्न झाल्याचे दिसत होते; परंतु पुढच्या वर्षी बाप्पाच्या पुन:आगमनाची ओढ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे आगमनाच्या वेळी आणि बाप्पाला निरोप देताना पावसाने हजेरी लावली होती. समुद्रकिनारे, तलाव, नदी अशा ठिकाणी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दीड दिवसाच्या बाप्पांची संख्या जास्त असल्याने सायंकाळी ५ नंतर बाप्पाला विसर्जनस्थळी नेण्यास सुरुवात झाली. टाळ, मृदुंगाचा गजर करीत तर कोणी डीजेच्या तालावर धमाल मस्ती करत बाप्पाला निरोप दिला. त्या वेळी विविध ढोलताशा पथकांनी परिसर चांगलाच दणाणून सोडला होता. गाण्याच्या तालावर अबालवृद्धांनी चांगलाच ठेका धरला होता. भगवे फेटे परिधान केलेले तरुण मंत्रमुग्ध होऊन नाचत होते.
वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी अलिबाग शहरामध्ये समुद्रकिनारी जाणारे मार्ग एक दिशा केले होते. पोलिसांनी एन्ट्री पाइंटला बॅरिकेड्स लावल्याने अनावश्यक वाहनांना विसर्जनस्थळी जाण्यास मज्जाव केला होता.
समुद्रकिनारी अलिबाग नगरपरिषदेमार्फत मदतकेंद्र उभारण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांनी जीवरक्षकही किनारी तैनात केले होते. लहान मुले, महिला आणि वयोवृद्धांना पाण्यात जाण्यापासून अडवण्यात येत होते. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेले विसर्जन रात्री १० वाजेपर्यंत सुरूच होते.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
रोह्यात ६९८ बाप्पा निघाले आपुल्या घरा
रोहा : तालुक्यात गेले तीन दिवस सुरू असलेल्या अविश्रांत पावसाच्या संततधारेत भावपूर्ण वातावरणात दीड दिवसांच्या ६९८बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. सोमवारी बाप्पांच्या आगमनापासून ते दीड दिवसांच्या विसर्जनातही मुसळधारेसह सक्रिय झालेल्या पावसामुळे भक्तगणांचा थोडा हिरमोड झाला होता. नगरपालिकेने गणपती विसर्जनासाठी विसर्जनस्थळावर योग्य ती व्यवस्था आणि विद्युत रोषणाई के ली होती.
नगराध्यक्ष संतोष पोटफोडे स्वत: विसर्जनस्थळांवरील सुविधांबाबत लक्ष ठेवून कर्मचाऱ्यांना सूचना देत होते. विसर्जनासाठी सर्वाधिक गर्दी होत असलेल्या स्मशानभूमीजवळील जुन्या पकटी पुलाकडे जाणारा रस्ता यंदा बंद करण्यात आल्याने गणेशभक्तांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रोह्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र परदेशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पेणमध्ये गणरायाला निरोप देण्यासाठी विर्सजनस्थळी गर्दी
च्पेण : येथील दीड दिवसांच्या २६६८ बाप्पांना दुपारी ४ वाजता भावपूर्ण निरोप देण्यासाठी नदी, तलाव, खाडीपात्र या विर्सजनस्थळांवर गणेशभक्तांची गर्दी उसळली होती. गेले तीन दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे उत्साह, चैतन्याची अनुभूती देणारा गणेशोत्सवाचा आनंद पावसाने साजरा करू दिला नाही. बाप्पांची प्रतिष्ठापना झाली, पाऊस थांबून उत्सावाचा आनंद साजरा करता येईल अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, पाऊस न थांबता जोरदार सरूच राहिल्याने मंगळवारी अखेर भरपावसात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला.
दीड दिवसाच्या गणरायाला निरोप
च्आगरदांडा : गणपती बाप्पा मोरया़़़, मंगलमूर्ती मोरया़़़, मोरया रे बाप्पा मोरया रे़़, असा जयघोष करत गणेशभक्तांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला आपापल्या घरात गणेशमूर्तींचे आगमन केले. सोमवारी पारंपरिक पद्धतीने बाप्पाचे स्वागत ठिकठिकाणी तालुक्यात करण्यात आले़ तर मंगळवारी दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मुरुड तालुक्यात एकही सार्वजनिक मंडळ नसल्याने घरगुती मूर्तीची मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठापना केली जाते. मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील पाच हजार १४६ घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना झाली.
रिमझिम पावसात बाप्पाचे विसर्जन
१कर्जत : तालुक्यातील कर्जत, नेरळ व माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक व खासगी अशा एकूण ९४५५ श्री गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. त्यापैकी मंगळवारी १९३९ दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये केवळ दोन गणपती सार्वजनिक होते. सकाळपासून पाऊस असल्याने पावसातच गणरायांना निरोप देण्यात आला.
२दुपारी ४ वाजल्यापासून विसर्जनाची सुरुवात झाली. कर्जत तालुक्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२३७ खासगी, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६७१ खासगी आणि माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० खासगी व एक सार्वजनिक असे एकूण १९३९ दीड दिवसांच्या गणरायाचे पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.