दारूच्या नशेत घोटला मित्राचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 01:00 AM2020-02-17T01:00:13+5:302020-02-17T01:00:23+5:30
राकेश गुप्ता हा ६ फेब्रुवारीला सकाळी एपीएमसी आवारात मित्रांसोबत आला होता
सूर्यकांत वाघमारे
कोपरखैरणेत राहणारा राकेश गुप्ता हा गतआठवड्यात बेपत्ता झाला होता. कामानिमित्ताने घराबाहेर जातो, असे तो आईला सांगून गेला असता, त्याची आणि आईची शेवटची भेट ही रुग्णालयातच झाली. मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवणावेळी झालेल्या किरकोळ भांडणातून एका मित्राने त्याच्या डोक्यात रॉड मारला. यामध्ये तो जखमी झाला असतानाही त्याला संपूर्ण रात्र व एक दिवस लॉजच्या खोलीत डांबून ठेवण्यात आले. अखेर त्याच्या मृत्यूच्या भीतीने मित्रांनीच त्याच्या अपघाताचा बनाव रचत त्याला रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, मृत्युपूर्वी त्याने आईला संपूर्ण घटनेची माहिती दिल्याने या गुन्ह्याचा छडा लागू शकला.
राकेश गुप्ता हा ६ फेब्रुवारीला सकाळी एपीएमसी आवारात मित्रांसोबत आला होता. दिवसभर त्यांच्यासोबत राहिल्यानंतर रात्रीच्या वेळी तुर्भेतील सुनीता बारमध्ये सर्व जण एकत्र दारू प्यायले. त्या ठिकाणी त्यांच्याच सोबतच्या अमोल सूर्यवंशी याच्यासोबत राकेशचा किरकोळ वाद झाला. या वादातून अमोलने तिथला लोखंडी रॉड उचलून राकेशच्या डोक्यावर मारला. या वेळी इतर मित्रांनी त्यांचे भांडण सोडवण्याचाही प्रयत्न केला; परंतु मद्यधुंद अवस्थेत अमोलला स्वत:ला आवर घालता आला नाही. अखेर केलेल्या हल्ल्यात राकेश गंभीर जखमी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच ते त्याला घेऊन तुर्भेतील एका लॉजवर गेले. त्या ठिकाणी घटनेची ती संपूर्ण रात्र व दुसरा दिवस त्याला डांबून ठेवल्याने राकेश मृत्यूशी झुंज देत होता. यादरम्यान अमोल व त्याचे साथीदार दुसऱ्या दिवशी पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी राकेश हा स्वत: मद्यपान करून पडल्याने जखमी झाल्याचा बनाव रचून त्याला रुग्णालयात दाखल केले. शिवाय, राकेशच्या आईलाही फोन करून तो पडल्याने जखमी झाल्याची माहिती दिली. मात्र, घडलेल्या खºया घटनेची माहिती दडपण्यासाठी त्यांनी राकेशला धमकी देऊन ठेवली होती. त्यामुळे सुरुवातीला राकेशनेही आपण पडल्याने जखमी झाल्याचे सांगितले; परंतु डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये गंभीर घावाने त्याच्या मणक्याला व डोक्याला आतून जखमा असल्याचे समोर आले. त्यामुळे आईने त्याला विश्वासात घेतले असता, त्याने घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. यानंतरही अमोल व त्याच्या साथीदारांनी हे प्रकरण दडपण्यासाठी अनेक प्रयत्न केले. याच दरम्यान राकेशचा मृत्यू झाल्याने त्याची आई लीला गुप्ता यांनी पोलिसांपुढे वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर शुक्रवारी रात्री एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अमोल याला अटक केली. तर आईच्या मायेपुढे राकेशने मन मोकळे केल्याने हा गुन्हा उघड होऊ शकला आहे.
मृत्यूपूर्वी राकेशने आईला संपूर्ण घटनेची सत्य माहिती दिल्याने या गुन्ह्याचा छडा लागू शकला.