निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोना महामारीत आर्थिक अडचण असली तरी रायगड जिल्ह्यातील मद्यपींनी मात्र उत्पादन शुल्क विभागाला भरभरून आर्थिक हातभार लावला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीअखेर रायगडातील मद्यपींनी कोटी लीटर बीयर, मद्य रिचवले आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या तिजोरीत ६९८ कोटींचा भरणा झाला आहे.
जिल्ह्यात वर्षभरात देशी मद्य ७१ लाख लीटर, विदेशी ६५ लाख लीटर, वाइन ३ लाख लीटर तर बीयर सर्वाधिक १ कोटी लीटर मद्यापींनी रिचवली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे वर्षाचे लक्षांक पूर्ण करण्यास मद्यापींनी मोठा हातभार लावला आहे. अवैध दारूच्या १६५९ केसेस वर्षभरात झाल्या असून ८८४ जणांना अटक केली आहे. वर्षभरात केलेल्या या कारवाईत २ कोटी ९२ लाखांचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केला आहे. यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या तिजोरीत महसूल जमा झाला आहे.
रायगड हा पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधी पर्यटक पर्यटनास येत असतात. यामध्ये स्थानिकांसह मद्य पिणाऱ्या पर्यटकांचीही संख्या मोठी आहे. शासनाने या वर्षी जिल्ह्यासाठी ८०८ कोटींचे लक्ष्यांक उत्पादन विभागाला दिले होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत ६९८ कोटींचे लक्ष्यांक पूर्ण झाले आहे. त्यामुळे शासनाने दिलेले लक्ष्यांक मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक क्रांती शेडगे यांनी दिली आहे. कोरोना मार्च २०२० पासून सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली होती. त्यामुळे सहा महिने सर्व बार व परमिट रूम, वाइन शॉप बंद होते. मद्यविक्रीमध्ये घट झाली होती. मात्र, कोरोनाकाळात अवैध मद्यविक्री सुरू असली तरी याचा फायदा हा उत्पादन शुल्क विभागाला झाला नव्हता.
महसुलात भरजिल्ह्यात पुन्हा मद्यविक्री सुरू झाल्याने देशी, विदेशी, बीयर, वाइन खरेदी प्रमाणात वाढ झाली. फेब्रुवारी अखेरपर्यत देशी मद्य ७१ लाख लीटर, विदेशी मद्य ६५ लाख लीटर, वाइन ३ लाख लीटर तर बीयर १ कोटी लीटर मद्यपींनी खरेदी करून रिचवली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या तिजोरीत ६९८ कोटी रुपये भरणा झाला आहे.
१५५९ अवैध मद्यविक्रीजिल्ह्यात विदेशी, परराज्यातील दारू, हातभट्टी, गावठी या अवैध मद्य विक्री करणाऱ्या व घेऊन येणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उचलला होता. परराज्यातील विदेशी मद्य आणणाऱ्या १६ केसेस आहेत. १५५९ अवैध मद्य विक्री, सांभाळणे, गावठी दारू पाडणे या अवैध धंद्यांवर कारवाई करून ८८४ जणांना अटक केली आहे. अवैध कारवाईत २ कोटी ९२ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाल्याची माहिती कीर्ती शेडगे यांनी दिली.