समुद्र खवळल्याने रायगड किनारपट्टीवर सतर्कता; मॅन डौंस चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 08:35 AM2022-12-11T08:35:06+5:302022-12-11T08:36:10+5:30
चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळला असून त्याचा परिणाम हा रायगड किनारपट्टीलाही होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : ऐन थंडीत रायगडकरांना पुढील चार दिवसांत मेघगर्जनेसह मध्यम ते हलका अवकाळी पाऊस अनुभवास मिळण्याची शक्यता आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौंस हे चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळला असून त्याचा परिणाम हा रायगड किनारपट्टीलाही होणार आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली असून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौंस हे चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी १० किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेला केंद्रस्थानी होते. ९ डिसेंबरपासून दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील पुड्डुचेरीच्या किनाऱ्यापासून वायव्येकडे सरकून ७५ ते ८५ किमी प्रतितास
वेगाने उत्तर तामिळनाडू ओलांडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस
आकाश ढगाळ राहणार असल्याने
रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची
शक्यता आहे.
जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष
जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी व नागरिकांनी सतर्क रहावे. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या ०२१४१-२२२०९७/८२७५१५२३६३ अथवा टोल फ्री क्रमांक ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशासनाने सूचित केले आहे.
खोल समुद्रात जाऊ नका
समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी पिके मळणी, कापणीसाठी तयार असतील तर पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
फळे भाजीपाला, शेत पिकांची सुरक्षित ठेवण करावी. जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी बांधावीत. अतिवृष्टीमुळे सखल भागात काही प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता राहील. मेघगर्जनेसह वादळीवारे व मध्यम ते हलका पाऊस असल्याने विजा चमकण्याची व पडण्याची शक्यता आहे.
गडगडाटी वाऱ्यासह पाऊस पडत असताना नागरिकांनी खुल्या व मोकळ्या भागात थांबू नये. विजेचे खांब, झाडे इ. ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांपासून दूर रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
वर्तविली पावसाची शक्यता
हवामानाच्या बदललेल्या परिस्थितीमुळे १० डिसेंबरपासून पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.