सारा ठाकूर मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2023 03:23 PM2023-08-04T15:23:31+5:302023-08-04T15:23:51+5:30
जिते गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनुपस्थिती भोवली
अलिबाग : पेणमधील जिते येथील सारा ठाकूर या १२ वर्षीय मुलीला मण्यार सापाने दंश केल्याची घटना २६ जुलै रोजी घडली होती. प्राथमिक उपचार न मिळाल्याने सारा हिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला होता. आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीत त्या दिवशी जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मिलिंद पाटील हे हजर नसल्याचे स्पष्ट झाले.
साराला प्राथमिक उपचार वेळेवर न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्यासंबंधात जिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयी अनुपस्थित वैद्यकीय अधिकारी मिलिंद पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आरोग्यसेवा संचालक आयुक्त यांच्याकडे सादर केला आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सांगितले.
सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयी उपस्थित असणे गरजेचे आहे. यापुढे मी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देणार असून, या भेटीवेळी जे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच बालकांचे लसीकरण करण्यापूर्वी सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांचे योग्य पर्यवेक्षण करावे.
- डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.
चुकीच्या लसीकरणप्रकरणी तिघे निलंबित
बालकांना चुकीची लस देणाऱ्या पेण तालुक्यातील जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन आरोग्य सहायक व एक आरोग्यसेवक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. १ मे २०२३ रोजी जिते आरोग्य केंद्रात पाच बालकांना गोवर रुबेला लस द्यायची असताना तेथील कर्मचाऱ्यांनी बीसीजी लस दिली होती.
संबंधित बालकांच्या शरीरावर जखमा होऊन त्यांना त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी चौकशीनंतर आरोग्य सहायक विकास पाटील, प्रियांका म्हात्रे, आरोग्यसेवक कोमल पाटील या तिघांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी निलंबित केले आहे. तसेच लसीकरणप्रकरणी डॉ. मिलिंद पाटील याचे निलंबन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.