रायगड : वाढत्या माेकाट कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये दहशत आहे. अलिबाग नगर पालिकेने पुढाकार घेत शहरातील तब्बल एक हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. यासाठी १० लाख रुपये खर्च झाला आहे. निर्बिजीकरणामुळे माेकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर आळा बसला असला तरी त्यांची दहशत कायम आहे.
शहरातील श्वानांची संख्या वाढू नये म्हणून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण २०१९-२० मध्ये करण्यात आले हाेते. सुरुवातीला ६५० आणि त्यानंतर ३५० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले हाेते. सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. अलिबाग शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले हाेते. माेकाट कुत्र्यांच्या संख्येला आळा बसावा यासाठी अलिबाग नगर पालिकेने कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा उपक्रम राबविला हाेता.
हजार कुत्र्यांमागे केवळ १२ कर्मचारीअलिबाग शहरातील भटक्या-माेकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसावा यासाठी सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेला ठेका देण्यात आला हाेता. त्यांच्याकडील असणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांमार्फत ही माेहीम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात ६५० आणि दुसऱ्या टप्प्यात ३५० अशा एकूण एक हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले हाेते.
अलिबाग काेळीवाडा, श्रीबाग परिसरात कुत्र्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. रात्री हे कुत्रे जाेराेने भुंकतात. त्याचप्रमाणे चित्रविचित्र आवाज काढत असल्याने परिसरातील नागरिकांची झाेपमाेड हाेत आहे. एकाच ठिकाणी घाेळक्याने हे कुत्रे राहत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
२०१९-२० या कालावधीत माेकाट आणि भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले हाेेते. सध्या कुत्र्यांची संख्या वाढलेली दिसत नाही. अलिबाग शहराला लागून कुरुळ, चेंढरे आणि वरसाेली ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे वेशीवर कुत्रे दिसून येतात. नागरिकांना त्रास हाेणार नाही याची काळजी घेण्यात येईल. गरज भासल्यास पुन्हा माेहीम हाती घेण्यात येईल. - प्रशांत नाईक, नगराध्यक्ष