अलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:51 AM2018-04-22T01:51:42+5:302018-04-22T01:51:42+5:30
मुंबईत अरबी समुद्राकडून वाहणारे थंड वाऱ्यांचे अस्तित्वही दिसत नसल्यामुळे आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे चाकरमान्यांच्या अंगातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत
बोर्ली मांडला : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र उन्हाच्या झळा सोसत आहे. कोकण विभागात अलिबाग येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अलिबाग येथे शनिवारचे तापमान हे ३५.६ एवढे आहे. उन्हाचे चटके आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत.
सौराष्ट्र, गुजरात आणि महाराष्ट्रात अॅण्टीसायकलॉन म्हणजेच प्रतिचक्रवाती वारे निर्माण झाल्याने पारा चढल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, गुजरातच्या दिशेने आलेले उष्ण वारे मुंबईत घुसल्यामुळे मुंबईचे तापमान वाढले आहे. पुढचे तीन दिवस असेच वातावरण असेल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यभरात अनेक भागांत तयार झालेले उष्ण वारे बाहेर जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे हे वारे जमिनीवरून वाहत आहेत. परिणामी, जमीन भट्टीप्रमाणे तापली असून, डांबरही अक्षरश: वितळले आहे. अलिबागचे किमान तापमान हे ३१.८ एवढे असते. मात्र, शनिवारी अलिबाग येथे ३५.६. डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आहे. अलिबाग येथे तापमान वाढल्याने उन्हाचे चटके अधिक बसत आहेत. येत्या दोन दिवसांत तापमान हे वाढणार असल्याचे अजयकुमार यांनी सांगितले आहे.
विदर्भात चार दिवस उष्णतेची लाट
विदर्भात पुढील चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून काही ठिकाणी वळीवाचा पाऊसही होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ राज्यात शनिवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूरमध्ये ४४़२ अंश सेल्सिअस नोंदविले आहे़
मुंबईत अरबी समुद्राकडून वाहणारे थंड वाऱ्यांचे अस्तित्वही दिसत नसल्यामुळे आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे चाकरमान्यांच्या अंगातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत, असे मुंबई कुलाबा येथील हवामान विभागाचे वैज्ञानिक अजयकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.