अलिबाग : अलिबाग कृषी बाजार समिती निवडणुकीत शिंदे गटाने उडी घेतल्याने निवडणुकीला ६३ वर्षांनंतर रंग चढला आहे. शेकापच्या १८ उमेदवारांची १ लाख ३ हजार रुपये अनामत रक्कमची एकच पावती सादर केली आहे. याबाबत बुधवारी ५ मार्च रोजी होत असलेल्या छाननी प्रक्रियेत शिंदे गटाकडून आक्षेप नोंदवला आहे. तर शेकाप कडून संदेश थळे, नंदन पाटील यांच्या विरोधात आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे वातावरण बिघडले असून याबाबतचा निकाल आज दुपारी अडीच वाजता जाहीर केला जाईल असे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अधिकारी अशोक मोरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मोरे आता अक्षेपावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
अलिबाग कृषी उत्पन्न समितीवर ६३ वर्ष शेकापचे वर्चस्व राहिले आहे. यावेळीही शेकापने १८ उमेदवार अर्ज विविध प्रवर्गातून भरले आहेत. यंदा शिंदे गटानेही या निवडणुकीत उडी घेऊन सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणुकीत रंग आला आहे. बुधवारी ५ एप्रिल रोजी छाननी प्रक्रिया सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सुरू झाली. यावेळी शेकापच्या उमेदवारांनी एकत्रित अनामत रक्कम भरल्याची पावती देण्यात आली आहे. प्रत्यक्षात प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र पावती असणे आवश्यक आहे. असे असताना एकत्रित पावती दिल्याने शिंदे गटाने निवडणूक अधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदवला.
अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख तसेच उमेदवार राजा केणी यांच्यासह उमेदवारांनी एकच पावती बाबत आक्षेप नोंदवला असल्याने वातावरण तापले होते. त्याचबरोबर शेकाप कडून संदेश थळे, नंदन पाटील यांनी कृषी उत्पन्न समिती मध्ये माल खरेदी विक्री केलेली नाही आहे. असा आक्षेप नोंदवला आहे. मात्र अलिबाग कृषी उत्पन्न समितीचे यार्ड नसल्याने खरेदी विक्री कुठे करणार असे आक्षेप घेतलेल्या उमेदवारांचे म्हणणे आहे. दोन्ही अक्षेपवर अडीच वाजता निकाल निवडणूक अधिकारी देणार आहेत. त्यामुळे निकालाकडे लक्ष लागले आहे. पोलिसांचाही छाननी वेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शेतकरी आता जागरूक झाला आहे. ६३ वर्ष सत्ताधारी यांनी काहीही काम न करता भ्रष्ट्राचार केला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न समितीत आम्ही निवडणूक लढवत आहोत. जिल्ह्यात शिंदे गटाने निवडणुकीत आपले उमेदवार दिले आहेत. - आमदार महेंद्र दळवी