अलिबाग : २०२२ या सरत्या वर्षाला निरोप आणि २०२३ नव वर्षाच्या स्वागताला पर्यटक लाखोच्या संख्येने अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांची भरती आली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तरुण मंडळी सह अबाल वृद्ध व्यक्तीची धमाल मस्ती सुरू आहे. त्यामुळे पुढील तीन चार दिवस अलिबाग तालुक्यात पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. पर्यटक आल्याने स्थानिक व्यवसायिक यांचे व्यवसाय ही तेजीत आहेत.
अलिबाग तालुक्यातील अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, रेवदंडा, किहीम, मांडवा याठिकाणी सुंदर आणि निसर्गाने नटलेले समुद्र किनारे आहेत. अलिबाग मध्ये येणारा पर्यटक ह्या समुद्र किनाऱ्यावर गेल्या शिवाय राहत नाही. समुद्र स्नानाचा आनंद पर्यटक लुटत आहेत. त्याचबरोबर जलक्रीडा, ए टी वी बाईक, सायकल, घोडा, उंट सफारी याचाही आनंद घेत आहेत. अलिबाग समुद्रात असलेल्या कुलाबा कील्यातही जाऊन पर्यटक ऐतिहासिक वास्तूला भेट देत आहेत. किल्याचा इतिहास जाणून घेत आहेत.
अलिबागसह तालुक्यातील इतर समुद्र किनारी ही धमाल मस्ती पर्यटकांची सुरू आहे. त्याचबरोबर अलिबाग समुद्रात मिळणाऱ्या ताज्या मासळी वरही पर्यटक ताव मारत आहे. त्यामुळे तालुक्यातील हॉटेलात पर्यटकांची मांसाहार खाण्यास रीघ लागलेली आहे. समुद्र पर्यटनासह तालुक्यातील धार्मिक, प्रेक्षणीय स्थळांनाही पर्यटक भेटी देत आहेत.
पर्यटक मोठ्या संख्येने तालुक्यात दाखल झाल्याने स्थानिक व्यवसायिक यांनाही लाभ झाला आहे. समुद्र किनारी व्यवसाय करणारे, रिक्षा, सितारा व्यवसायिक, पापड, लोणची व्यवसायिक यांचाही पर्यटक येण्याने व्यवसाय तेजीत आहे. त्यामुळे पुढील तीन चार दिवस अलिबाग तालुक्यातील अर्थकारणात मोठी वाढ पर्यटकांमुळे होणार आहे.