राजेश भोस्तेकर
अलिबाग : अलिबाग निसर्गाच्या सौंदर्याची सर्वानाच भुरळ पडलेली आहे. उद्योजक, राजकारणी, अभिनेते तसेच क्रिकेटर हे अलिबागच्या निसर्गाला मोहून अलिबागकर झाले आहेत. त्यामध्ये आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जगविख्यात क्रिकेटर फलंदाज विराट कोहली याची भर पडली आहे. अलिबाग आवासमध्ये आवास लिव्हिंग अलिबाग एल एल पी या बंगलो प्रोजेक्ट मध्ये ६ कोटीचा बंगला खरेदी केला आहे. विराटचा भाऊ विकास कोहली याने सदरचा खरेदी व्यवहार गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात विराटच्या वतीने पूर्ण केला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, अजित वाडेकर, ईशांत पंत यांच्यासह विराट कोहली ही अलिबागकर झाला आहे.
अलिबागमध्ये आवास येथील आवास लिव्हिंग अलिबाग एल एल पी याचे बंगलो प्रोजेक्ट आहेत. निसर्गाच्या सानिध्यात हा प्रकल्प बनविण्यात आला आहे. अनेक कलाकार, क्रिकेटर या प्रकल्पात बंगलो खरेदी करीत आहेत. नुकतेच अभिनेते राम कपूर व गौतमी कपूर यांनीही या प्रकल्पात २ घरे खरेदी केले आहेत. विराट कोहली हे सुद्धा या प्रकल्पाचे भाग झाले आहेत. विराट कोहली याने तब्बल ६ कोटी रुपयांना एक घर खरेदी केले आहे.
सद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघामध्ये चालू असलेल्या टेस्ट मालिकेमुळे विराट स्वतः अलिबाग येथे उपस्थित राहू शकला नाही. परंतु विराटचा भाऊ विकास कोहली याने सदरचा खरेदी व्यवहार विराटच्या वतीने पूर्ण केला, सदर कामी आवास लिव्हिंग प्रकल्पाचे अलिबाग मध्ये, मागील १७ वर्ष जमिनी विषयी कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत असलेले ऍड महेश म्हात्रे यांनी याकामी सर्व कागत्रपत्रीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
काय आहे? आवास लिव्हिंग अलिबाग बंगलो प्रकल्प
आवास या मुंबई पासून स्पीड बोटच्या सोयीमुळे १५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य गावी, अत्यंत प्रगत अशा सोई सुविधा उपलब्ध करून सर्व घर खरेदी दाराना मोहित करणारा असा प्रकल्प आहे. बांधकाम करणे पूर्वी आवश्यक असलेल्या टाऊन प्लॅनिंग कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांचे हुकूम प्राप्त केल्यानंतरच बंगलो विक्री केले जातात, सर्व कायदेशीर पूर्तता पूर्ण केल्यामुळे सर्व राष्ट्रीयकृत बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होत आहे. याधी राम कपूर व गौतमी कपूर या कलाकारांनी येथे २ घरे खरेदी केली आहेत.
२ हजार स्केअर फुटाचा अद्यावत बंगला
आवास येथे विराट कोहली याने आवास लिव्हिंग अलिबाग एल एल पी या प्रकल्पात २ हजार स्केअर फूटाचा बंगला खरेदी केला आहे. यामध्ये ४०० स्केरअर फूट स्विमिंग पुलही आहे. बंगल्यामध्ये अद्यावत असे फर्निचर सोयी सुविधाने युक्त असे साहित्य आहे.