गोहत्येच्या निषेधार्थ आज अलिबाग बंद ; शहराला छावणीचे रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 02:56 AM2018-08-01T02:56:00+5:302018-08-01T02:56:09+5:30
शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बुधवारी अलिबाग बंदची हाक दिली आहे. त्याला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने अलिबाग शहरातील दैनंदिन व्यवहारांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
अलिबाग : शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बुधवारी अलिबाग बंदची हाक दिली आहे. त्याला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने अलिबाग शहरातील दैनंदिन व्यवहारांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. बंदमुळे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जागोजागी पोलीस तैनात करण्यात येणार असल्याने शहराला पोलीस छावणीचे रूप येणार असल्याचे बोलले जाते.
शुक्र वार २७ जुलै रोजी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला परिसरात गोहत्या करून तिचे मांस विकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. या प्रकरणी अब्दुस सय्यद, शराफत फकी आणि इंद्रीस चौधरी यांना अटक करु न न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तीनही आरोपींना बुधवार, १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. याच दिवशी शहरामध्ये बंद पुकारण्यात आला आहे.
गोमांस विक्रीमुळे विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. अलिबाग शहर हे शांतताप्रिय शहर आहे. या ठिकाणी सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन विविध सण साजरे करण्याची परंपरा आहे.त्यामुळे शहरामध्ये गोहत्येसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी अलिबाग बंदची हाक दिली आहे. शहरातील जैन संघटना, सनातन भारत, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विविध व्यापारी संघटनांनी भाजपाने पुकारलेल्या अलिबाग बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच बंदमध्येही त्या सहभागी होणार असल्याने बाजारपेठेतील विविध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे.
बंद पाळण्यासाठी कोणावरही निर्बंध नाहीत, परंतु जास्तीतजास्त नागरिकांनी, आस्थापनांनी बंदमध्ये सामील होऊन सहकार्य करावे, बंद शांततेमध्ये पाळण्यात यावा असे, आवाहन भाजपाचे नेते अॅड. महेश मोहिते यांनी केले आहे.
व्यापाºयांच्या लाखोंच्या उलाढालीवर परिणाम
अलिबाग शहर हे पर्यटकांच्या पसंतीचे शहर आहे. त्यामुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. पर्यटकांच्या जीवावरच येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल इंडस्ट्री, रेस्टॉरंट, लॉजिंग, कॉटेजेस, ट्रॅव्हल्स यासह अन्य छोटे-मोठे उद्योगधंदे तग धरु न आहेत. हॉटेल इंडस्ट्रीमार्फत रोजची लाखो रु पयांची उलाढाल होत असल्याने एक दिवसाच्या बंदमुळे फार मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे बोेलले जाते.
शहरामध्ये विविध असणारी किराणा मालाची दुकाने, कपडा मार्केट, भाजी मंडई, मासळी बाजारातील आर्थिक उलाढालही प्रचंड मोठी आहे. त्या व्यवसायावरही बंदचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
विविध शाळा, महाविद्यालये,बँका, सरकारी, निम सरकारी आस्थापनांना बंदची विशेष झळ बसणार नाही. असे असले तरी दैनंदिन कामांसाठी नागरिक बाहेर पडणार का हाच मोठा प्रश्न आहे.
एसटी बंदमध्ये सहभागी होणार नाही. अलिबाग आगारातून नियमित गाड्या सोडण्यात येतील, मात्र आंदोलकांनी गाड्या अडवल्यास नाईलाजाने आम्हाला गाड्या सोडता येणार नाही, असे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले.
शहरामध्ये १ आॅगस्ट रोजी भाजपाने बंदची हाक दिलेली आहे. आंदोलकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक, अलिबाग
अलिबागचे नागरिक सुज्ञ आहेत. त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे
- प्रशांत नाईक,
नगराध्यक्ष, अलिबाग