अलिबाग आगाराला ‘अच्छे दिन’, मे महिन्यात ४.४० कोटींची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 11:15 AM2023-06-21T11:15:32+5:302023-06-21T11:15:41+5:30
उन्हाळी सुटीत अलिबागमध्ये तब्बल ८ लाख ४३ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वाधिक उच्चांकी उत्पन्न मिळविता आले आहे.
अलिबाग : उन्हाळी सुटीत पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात अलिबागची सफर केल्याचा फायदा स्थानिक व्यावसायिकांबरोबरच अलिबाग बसस्थानक आगारालाही झाला आहे. केवळ मे महिन्यात प्रवाशांच्या भाड्यापोटी तब्बल ४.४० कोटींची कमाई केली असून तब्बल तीन दशकानंतर ‘अच्छे दिन’ अनुभवता आले आहेत. उन्हाळी सुटीत अलिबागमध्ये तब्बल ८ लाख ४३ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वाधिक उच्चांकी उत्पन्न मिळविता आले आहे.
अलिबाग एसटी आगार हे जिल्ह्याच्या मुख्यालयात शहरातील मुख्य बाजारपेठेत असून या ठिकाणाहून रोज हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. वाढत्या पर्यटकांमुळे शिवशाहीसह अन्य एसटी बसेसना नेहमी गर्दी होत असते. संपलेल्या उन्हाळी सुटीमध्ये पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे अलिबाग एसटी आगार हे मे महिन्यात सर्वाधिक उत्पन्न देण्यात जिल्ह्यात अव्वल ठरले.
मे महिन्यात आगारातून शिवशाहीसह एकूण ८० बसेस प्रवाशांना घेऊन ७ लाख ८१ हजार किलोमीटर धावल्या. येथून राज्याच्या विविध ठिकाणी बसमधून ८ लाख ४३ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून एकूण ४.४० कोटी उत्पन्न मिळाले. या प्रवाशांमध्ये ४१ टक्के महिलांनी म्हणजे ३.४८ हजार किमी प्रवास केला. त्यांना तिकिटावर ५० टक्के सवलत असल्याने जवळपास १.६० कोटी रुपये मिळाले.
एकजुटीचे फळ : अलिबाग आगाराचे उत्पन्न वाढीसाठी चालक, वाहक यांचे मोलाचे सहकार्य यासाठी लाभले आहे. अनेकांनी सुट्टी न घेता आपली सेवा बजावली आहे. तसेच बसेस नादुरुस्त न ठेवता त्या प्रवाशाच्या सेवेत उत्तम राहण्यासाठी यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आहे. अलिबाग एसटी आगाराच्या सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी एकीचे सामर्थ्य दाखवून उत्पन्न वाढीस मोलाची साथ दिली आहे.
अलिबाग आगाराला ३० वर्षांनी
पहिल्यांदाच एका महिन्यात कोट्यवधींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. हे यश चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक, प्रशासकीय
अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने मिळाले आहे. त्यामुळे उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आगाराची जबाबदारी अजूनच वाढली आहे.
- ए.व्ही. वनारसे, अलिबाग आगार व्यवस्थापक