अलिबागमध्ये एकाच रात्रीत चार घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 02:08 AM2017-12-19T02:08:28+5:302017-12-19T02:08:36+5:30
तालुक्यातील हाशिवरे-रेवस पट्ट्यातील गावांमध्ये रविवारची रात्र हादरवणारी ठरली. चोरट्यांनी सलग चार घरे फोडून लाखो रुपयांची रोकड आणि लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोयनाड हद्दीतील ज्वेलरीचे दुकान फोडून तेथील चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. या घटनेने गावांतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
अलिबाग : तालुक्यातील हाशिवरे-रेवस पट्ट्यातील गावांमध्ये रविवारची रात्र हादरवणारी ठरली. चोरट्यांनी सलग चार घरे फोडून लाखो रुपयांची रोकड आणि लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोयनाड हद्दीतील ज्वेलरीचे दुकान फोडून तेथील चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. या घटनेने गावांतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी शहराकडील मोर्चा वळवून आता थेट ग्रामीण भागांना लक्ष्य केल्याने शहरांबरोबरच ग्रामीण भागही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. मांडवा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शहरी भागांमध्ये चोरट्यांचा असणारा धुमाकूळ आता ग्रामीण भागाकडे वळला असल्याने पोलिसांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे राहिले आहे. सध्या हिवाळा सुरु असल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. चोरट्यांनी याचाच फायदा घेत घरफोडीचा प्लॅन सहज पूर्ण केला आहे. रविवारी रात्री जगन्नाथ पाटील यांच्या घरात शिरुन चोरट्यांनी कपाटातील १० हजार रुपये आणि तब्बल ११ तोळे सोने चोरले. अलिबाग तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अनिल गोमा पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केला आहे. पाटील यांच्या घरातील सर्वजण कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते. तसेच पाटील यांच्या अन्य दोन भावांच्या घरातही चोरी केली. चोरट्यांनी घराचे कडीकोयंडा उचकटून त्यांच्या घरात प्रवेश केला. पाटील यांच्यासह त्यांच्या भावाच्या घरातील ५० हजार रोख, १३ सोन्याच्या अंगठ्या किंमत ९० हजार रुपये, कानातील सोन्याचे तीन जोड २० हजार रुपये किमतीचे, एक तोळे सोने, १० हजार रुपये किमतीची दोन घड्याळे, सुरेंद्र पाटील यांच्या घरातील दोन हजार रुपये आणि अनिल यांचे मोठे बंधू जगन्नाथ पाटील यांच्या घरातील दोन लाख १० हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. त्याचप्रमाणे फुफादेवीचा पाडा येथील बंद घरातील लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत.
पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील सौभाग्य ज्वेलर्सही चोरट्यांनी फोडले आहे. त्या दुकानातील चांदी मोठ्या प्रमाणात चोरली आहे. सोने ज्या तिजोरीत ठेवण्यात आले होते त्याचे लॉक भक्कम असल्याने चोरट्यांना ते तोडता आले नाही.
पोलिसांचा वचक राहिला नाही
जिल्ह्यात गेल्यावर्षी तब्बल २३२ घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यातील ७० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षीही घरफोडीचा आलेख वाढत असल्याने पोलिसांचा वचक कमी तर झाला नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागाकडे चोरट्यांचा मोर्चा -
जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये सातत्याने चोरीच्या घटना घडतात. मात्र ग्रामीण भागामध्ये त्याचे प्रमाण कमी होते. चोरट्यांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागांकडे वळवला आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. लवकरच त्यांना गजाआड केले जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक एम.आर.बुरांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अनिल गोमा पाटील यांच्या घरापासून काही अंतरावर दारुच्या बाटल्या आणि काही पदार्थ पडल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे चोरट्यांनी चांगलीच जंगी पार्टी केली असावी अथवा त्यांचे काही साथीदार तेथे थांबले असावेत, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. चोरीमागे मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.