अलिबाग : लोकसभेच्या निवडणुकीत २०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाने घोषणांचा पाऊस पाडला आणि सत्तेवर आल्यावर ‘ ती तर जुमलेबाजी..’ होती असे भाजपामधील मंत्रीच सांगत आहेत. त्याचप्रमाणे अलिबागला रेल्वे आणणे, हादेखील एक जुमलाच असल्याने हीच जुमलेबाजी बुमरँग होऊन भाजपा सरकारवर कोसळणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी येथे केले. अलिबाग येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.भाजपाने जुमलेबाजी करून मतदारांची दिशाभूल केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना किंमत चुकती करावी लागणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार तथा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गेल्या साडेचार वर्षांत ठोस विकासात्मक एकही काम केलेले नसल्याने त्यांचे कर्तृत्व शून्य आहे, त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत त्यांना नमो मोदीचा जप करावाच लागेल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. अलिबाग लोकल आणण्याचे गीते यांनी सांगितले ते अद्याप पूर्ण झालेले नसताना, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आता अलिबागला पॅसेंजर आणण्याचे जाहीर करणे हास्यास्पद आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासने देण्यात येत असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.आघाडी सरकाच्या १५ वर्षांच्या कालावधीत असंख्य विकासकामे झाली आहेत. जुन्या योजनांना नवीन नावे देऊन त्या योजना अमलात आणण्याचेच काम आताच्या युती सरकारने केले आहे. भारतीय संविधानानेच प्रत्येक आमदारांना विकासकामे करण्यासाठी विशिष्ट निधी देऊ केला आहे. सरकारमध्ये असणारेच त्याचे वाटप करतात; परंतु सत्ताधारी आणि विरोधी आमदार यांच्यामध्ये सर्वाधिक निधी कोणी आणला याला महत्त्व आहे. राजशिष्टाचाराने केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री हे पद तुलनात्मक एकाच दर्जाचे आहे. त्यामुळे खासदार गीते यांनी विकासकामांसाठी किती निधी आणला हे सांगणे गरजेचे आहे.निवडणुकीच्या तोंडावरच कंपन्यांकडून सीएसआर फंड घेऊन विकासकामे का केली जात आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करून गेल्या साडेचार वर्षांत रुग्णवाहिका जनतेला अर्पण करण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत, याचेही उत्तर गीते यांना द्यावे लागणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एकमेकांवर केवळ टीका आणि टिप्पणी करण्यातच शिवसेना आणि भाजपाची साडेचार वर्षे फुकट गेल्याचेही त्यांनी सांगितले.>लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खोटा प्रचाररत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्प रद्द करून तो रायगडकरांच्या माथी मारला जात आहे आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे चित्र सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणून बुजून निर्माण केले जात आहे. माझी उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसताना विरोधकांनी मला किती गंभीरपणे घेतले आहे. हेच यावरून स्पष्ट होते, असेही तटकरे यांनी सांगितले.सिडकोने अद्यापही रायगड जिल्ह्यातील ४० गावांतील जमिनीचे संपादन केलेले नाही. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये नेमका कोणता प्रकल्प येणार आहे, याबाबत सरकारने काहीच जाहीर केलेले नाही. त्यामुळे नेमका कोणत्या प्रकल्पाला विरोध करायचा हे सांगता येत नाही. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये एकही रासायनिक प्रकल्प नको, हे या आधीही ठणकावून सांगितले असल्याची आठवण त्यांनी करून दिली.>टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची भाषा कोणाचीमुंबई-गोवा महामार्गाला टोल बसवण्यात येणार असल्याचे मध्यंतरी खासदार गीते यांनीच स्पष्ट केले होते; परंतु टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची भाषा शिवसेनेनेच केली होती, त्यामुळे गीते यांचे विधान संभ्रम निर्माण करणारे आहे. टोलमुक्त करण्यासाठी मलाच केंद्रात जावे लागणार आहे आणि त्याच वेळी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.>अलिबागमधील नाराज गट लवकरच आघाडीच्या ट्रॅकवरआघाडीमध्ये शेकापने सोबत केल्याने निश्चितपणे पारडे जड झाले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेलेल्या सहकाऱ्यांना जवळ घेतले जाईल. त्यासाठी योग्य वेळी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट करून अलिबागमधील नाराज झालेले काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर हे लवकरच आघाडीच्या ट्रॅकवर लवकरच येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पेण तालुक्यातील माजी मंत्री रवींद्र पाटील हे भाजपाच्या ट्रॅकवर गेले असल्याने तेथील उर्वरित काँग्रेसलाही आघाडीच्या ट्रॅकवर आणण्यात यशस्वी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलिबागला रेल्वे आणणे हादेखील एक जुमलाच- सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 11:56 PM