अलिबाग : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अलिबागचे नाव बदलून मायनाक भंडारी करावे अशी मागणी केली आहे. यावर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे यांनी विरोध दर्शवून नार्वेकर यांच्या मागणीचा निषेध केला आहे. निवडणूक काळात अशी मागणी करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम नार्वेकर यांनी करू नये असे ही रघुजी राजे आंग्रे यांनी म्हटले आहे. अलिबाग हेच नाव राहावे असे सांगून बदलायचे झाल्यास कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा विचार व्हावा अशी प्रतिक्रिया रघुजी राजे यांनी दिली आहे.
मायनाक भंडारी याच्या बाबत माझ्या मनात आदर आहे. ऐतिहासिक अलिबाग नगरी उभारणीत, जडण घडणीत सरखेल कान्होजी आंग्रे यांचे योगदान एकमेव द्वितीय आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या काळात शहराचे नाव बदलण्याचे मुद्दे उपस्थित करून एखाद्या समाजाचे लांगुन चालन करणे किंवा त्याच्यासाठी राजकीय अभिनिवेश बाळगून कुठल्या प्रकारची मागणी करणे हे समर्थनीय नाही आहे. मी याचा निषेध करतो. असे रघुजी राजे आंग्रे यांनी म्हटले आहे.
अलिबागचे नाव हे ऐतिहासिक नाव आहे. या नगरीला एक ऐतिहासिक वारसा आहे. कान्होजी आंग्रेच्या कालखंड पासून ते आजवर नगरिने अनेक नवरत्न महाराष्ट्राला देशाला दिली आहेत. शहराचे नाव हे अलिबागच राहिले पाहिजे जर बदलायचे झाल्यास कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा विचार झाला पाहिजे माझे प्रामाणिक मत आहे. निवडणुकीच्या काळात अशी मागणी करणे हे अनेक समाजात तेढ निर्माण करणे कारण नसताना वाद उपस्थित करण्याचा विषय आहे. याबाबत राहुल नार्वेकर यांनी दूर राहावे असे माझे मत आहे. असेही आंग्रे यांनी म्हटले आहे.