अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना काेराेनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 06:53 PM2020-09-07T18:53:32+5:302020-09-07T19:18:40+5:30
10 दिवस राहणार हाेम आयसाेलेशनमध्ये
रायगड - अलिबागमतदार संघातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोव्हिड-१९ चाचणी साेमवारी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार दळवी यांनी केले आहे. अलिबाग तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत चालला आहे. 6 सप्टेंबरपर्यंत अलिबाग तालुक्यातील काेराेना रुग्णांची एकूण संख्या दाेन हजार 604 वर पाेचली आहे, तर 67 रुग्णांचा काेराेनामुळे अंत झाला आहे.
अलिबागमध्ये दिवसाला किमान 100 रुग्ण सापडत असल्याने सर्वांमध्येचे चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनलाॅकनंतर सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. काेराेना जगातून नाहीसा झाला आहे असाच समज करुन नागरिकांनी घेतला असल्याचे हाेणाऱ्या गर्दी वरुन दिसून येते. परिणामी काेराेना रुग्णांची वाढ झपाट्याने वाढत आहे.
काहीच दिवसांपूर्वी प्रसिध्द बिल्डर प्रताप गंभीर यांचा काेराेनाच्या संसर्गाने मृत्यू झाला हाेता. त्याचप्रमाणे आतापर्यंत अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, प्रसिध्द उद्याेजक सत्यजीत दळी, अलिबाग राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष दत्ता ढवळे, शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यासह अन्य विविध राजकीय नेत्यांना, अधिकारी, डाॅक्टर, पाेलिस अधिकारी, पत्रकार यांना काेराेनाची लागण हाेऊन गेली आहे. हे सर्व चित्र डाेळ्यासमाेर असतानाही नागरिक याच्यामधून धडा घेताना दिसत नसल्याने आर्श्र्चय व्यक्त करण्यात येत आहे.
अलिबागचे आमदार दळवी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज (७ सप्टेंबर) ते मुंबईत सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाकरिता निघाले होते. धरमतर येथे पोहोचल्यावर त्यांना त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तेथूनच ते माघारी फिरले आणि क्वारंटाईन झाले आहेत. पुढचे १० दिवस ते होम क्वारंटाईन राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जे कोणी आ.दळवी यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन आ. महेंद्र दळवी यांनी केले आहे.