अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. त्यातच शिवसेनेच्या शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही रायगड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांना पसंती दिली आहे. भाजपने याबाबत आत्मपरीक्षण करावे, आज लोकसभेसाठी दावा करीत आहेत.
उद्या विधानसभेसाठीही दावा करतील. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर यावर निर्णय होणे अपेक्षित आहे, असे मत आ. महेंद्र दळवी यांनी मांडले आहे. दळवी यांच्या या विधानामुळे शिंदे गटाने रायगड लोकसभेवरील दावा सोडल्याचे मानले जात आहे. शिंदे गट आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे यावरून दिसत आहे.
वरिष्ठ पातळीवर निर्णयरायगडाची जागा युतीमध्ये कोणाला देणार याबाबत अजून निश्चिती झालेली नसल्याचे चित्र आहे. युतीचे मित्र असलेले विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनाही विरोध केला जात आहे. लोकसभेवेळी जर अशी परिस्थिती असेल तर विधानसभेलाही चर्चा होईल. यामुळे युतीत दुरावा निर्माण होईल. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होणे आवश्यक आहे, असे दळवी यांनी सांगितले.