राजेश भोस्तेकर ,अलिबाग : महिला दिनाच्या पूर्व संध्येला तहसील कार्यालय अलिबाग आणि उपविभागीय कार्यालय अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने नागरिकांना विविध दाखले वाटप तसेच महाराष्ट्र शासनाच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत राज्यातील शिधापत्रिकाधारक यांना सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयानुसार अंत्योदय धारक ९४ महिलांना एक कुटुंब एक साडी योजनेअंतर्गत मोफत साडी वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून महिला मतदार यांचे मतदार यादीत प्रमाण वाढविणे करिता महिला मतदार नोंदणी कार्यक्रमही यावेळी राबविण्यात आला.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी महेंद्र दळवी, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण तसेच तहसीलदार अलिबाग विक्रम पाटील आणि महसूल विभागातील सर्व नायब तहसीलदार व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शासनाच्या योजनेअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका धारक ९४ महिलांना साड्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांग आणि विधवा परीतकत्या १७ महिलांना शिधापत्रिकेचेही वाटप कार्यक्रमात करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत दाखल्यांचे वाटप सदर कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरूपात नव महिला मतदारांचे नोंदणीचे अर्ज सदर कार्यक्रमाप्रसंगी भरून घेण्यात आले.