अलिबाग: दहावी निकालातही रायगडच मुंबई विभागात अव्वल; दहावीचा ९६.७५ टक्के निकाल, मुलीच सरस
By राजेश भोस्तेकर | Published: May 27, 2024 02:56 PM2024-05-27T14:56:25+5:302024-05-27T14:58:10+5:30
मागील वर्षाच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले
राजेश भोस्तेकर
अलिबाग : विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परिक्षेचा निकाल सोमवारी २७ मे रोजी ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड विभाग हा मुंबई विभागात पुन्हा अव्वल ठरला आहे. रायगडचा निकाल ९६.७५ टक्के लागला असून यंदा १.४७ टक्क्याने वाढ झाली आहे. यंदाच्या निकालात रायगडाच्या मुलीचं मुलापेक्षा निकालात भारी पडल्या आहे. दहावीच्या परीक्षेत ९५.८७ टक्के मुले, तर ९७.६५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा उत्तीर्ण होण्यात मुलीचा टक्का ०.९७ टक्क्यांनी वाढला आहे. तर मुलांचा १.८८ टक्क्यांनी वाढला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च, २०२४ मध्ये इयत्ता दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी तसेच पालकांचे लक्ष लागले होते. या परिक्षेचा निकाल सोमवारी २७ मे रोजी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. दहावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३५ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३५ हजार ७२७ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. निकालात १७ हजार ३४१ मुले, १७ हजार २२७ मुली असे एकूण ३४ हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार १५९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.७५ टक्के इतके आहे.
५४.३५ टक्के पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण
रायगड जिल्ह्यातील ५४७ पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. यामधील ५३९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी २९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २४५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५४.३५ टक्के इतके आहे.
८९ टक्के खाजगी विद्यार्थी उत्तीर्ण
रायगड विभागात १०१६ विद्यार्थी यांनी १७ नंबर अर्ज दहावी परीक्षेसाठी भरला होता. ९८२ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. यापैकी ८७४ विद्यार्थी हे बाहेरून परीक्षेला बसून उत्तीर्ण झाले आहेत. ८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकालात मुलींचीच बाजी
प्रवर्ग परीक्षा अर्ज परिक्षेला सामोरे गेलेले उत्तीर्ण टक्के
मुले १८१९४ १८०८७ १७३४१ ९५.८७
मुली १७७१९ १७६४० १७२२७ ९७.६५
एकूण ३५९१३ ३५७२७ ३४५६८ ९६.७५
तालुकानिहाय दहावी निकाल
तालुका - टक्के
पनवेल - ९७.७६
उरण - ९६.५६
कर्जत - ९४.९७
खालापूर - ९४.५४
सुधागड - ९२.५९
पेण - ९६.६९
अलिबाग - ९६.८१
मुरुड - ९५.९९
रोहा - ९६.५४
माणगाव - ९७.६८
तळा - ९५.५४
श्रीवर्धन - ९६.२९
म्हसळा - ९७.५६
महाड - ९७.५८
पोलादपूर - ९६.९४