अलिबाग : समुद्रकिनारी सुमारे सात फूट उंचीचा मृत इंडियन डॉल्फीन मासा आढळला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, वन विभाग आणि अलिबाग नगर पालिकेने तातडीने त्या माशाला समुद्र किनारी खड्ड्यामध्ये पुरुन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. रायगडमधील समुद्र किनारी मृत डॉल्फीन मासे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अलिबाग न्यायालय इमारतीच्या पाठीमागील समुद्र किनारी भरतीबरोबर एक महाकाय मासा वाहत येत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. माशाच्या शरीरातून रक्तस्त्रावही झाला होता. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कळविण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, वन विभागाचे गोविंद लंगाटे, विलास पाटील, अनिल नाईक आणि अलिबाग नगर पालिकेचे कर्मचारी यांनी तातडीने जेसीबीच्या साह्याने समुद्र किनारी खड्डा करुन त्या मृत डॉल्फीनला पुरले. सुमारे १५ दिवसांपूर्वी मोठ्या जहाजामुळे माशाला जखम झाली असावी, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असावा, असे वन विभागाचे गोविंद लंगाटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तातडीने त्याला पुरले नसते तर मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी पसरली असती, असे सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
अलिबाग समुद्र किनारी मृत डॉल्फीन
By admin | Published: March 28, 2016 2:19 AM