अलिबाग : जिल्ह्यात जत्रांचा हंगाम सुरु, स्थानिकांचा होणार अर्थिक अधार
By निखिल म्हात्रे | Published: November 4, 2022 03:11 PM2022-11-04T15:11:00+5:302022-11-04T15:11:27+5:30
भातकापणीचा हंगाम संपला की रायगडात गावोगावच्या जत्रांना सुरूवात होते.
अलिबाग : भातकापणीचा हंगाम संपला की रायगडात गावोगावच्या जत्रांना सुरूवात होते. खालापूर तालुक्याकतील धाकटी पंढरी म्हणजेच साजगावची जत्रा म्हणजे रायगडकरांसाठीच पर्वणीच. पारंपरिकपणाचा बाज जपणाऱ्या या जत्रेत बदलणाऱ्या काळाचीही झलक दिसतेय. या यात्रोत्सवाला शुक्रवार पासून सुरुवात होत आहे. त्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.
मागील दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणानेने जिल्ह्यातील जत्रोत्सव रद्द झाला होता. त्यामुळे स्थानिकांना रोजगार बुडाला होता. जिल्ह्यात साजगावची जत्रा, अलिबाग तालुक्यात नागेश्वर आवास, कनकेश्वर, वरसोली विठोबा, चौल भोवाळे येथील दत्तगुरु त्याचप्रमाणे रोहा तालुक्यातील महादेववाडी येथील महादेवाची, मुरुड तालुक्यातील दत्तात्रेय अशा अनेक यात्रा या काळात भरविण्यात येत असतात. यासर्वात साजगाव येथील यात्रा सलग 15 दिवस भरते, या जत्रेची इतिहासात नोंद आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील निर्मल एकादशीला या मंदिरात जत्रोत्सव असतो. जत्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापाऱ्यांनाही या जत्रेमुळे सुगीचे दिवस येत असतात. देवाच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांपासून अगदी केरसुणीपर्यंतची विक्री इथं होत असते. दरवर्षी या जत्रेतील उलाढाल कोटींच्या घरात असते. प्रचंड गर्दी असूनही तेवढीच शिस्तबद्ध म्हणून या जत्रेकडे पाहिले जाते. जत्रेच्या निमित्ताने चालणारा व्यापारउदीम हा आजही छोट्या छोट्या दुकानदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जत्रेतील या दुकांनाचा बच्चेकंपनीसह मोठेही आनंद लुटतात. वरसोलीच्या जत्रेने जपलेली खाद्यसंस्कृती हा देखील या जत्रेतला मौजेचाच भाग असतो.
कोरोना नंतरची पहिली जत्रा असल्याने लोकांमध्ये उत्साह आहे. यामुळे जत्रेतील नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे. जत्रेत चोऱ्या व चैन स्नॅचिंग हाऊ नये यासाठी पोलिसांचं लक्ष असणार आहे. तसेच कुठे बेवारस वस्तू असेल तर पोलिसांना कल्पना द्यावी.
सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक.