अलिबाग : रायगड जिल्ह्यात आज सकाळ पासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्या मुळे अलिबाग वडखळ रस्त्यावर राऊत वाडी येथे वडाचे झाड पडल्याने रस्ता बंद झाला. अलिबाग वडखळ रस्त्यावर यामुळे दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागून कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस, वेशवी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी आणि कटरच्या साहाय्याने झाड कापून रस्ता मोकळा केला. अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.
अलिबाग वडखळ रस्त्यावर गोंधळ पाडा ते कार्ले खिंड दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वड पिंपळ तसेच इतर मोठी झाडे आहेत. अनेक झाडे ही जीर्ण झाल्याने ती पडण्याची नेहमीच भीती असते. निसर्ग वादळात अनेक झाडे पडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यावर आलेली झाडाची फांद्या तोडण्यात आल्या होत्या. मात्र राऊत वाडी येथील वडाचे झाड हे पूर्ण वाकले होते. त्यामुळे ते कधीही पडण्याची शक्यता होती.
अखेर बुधवारी ६ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या पावसाने वाकलेले झाड रस्त्यावर पडले. साधारण साडे नऊच्या सुमारास हे झाड पडले होते. याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि वेश्वी ग्रामपंचायत कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जे सी बी आणि कटर च्या साहाय्याने एका बाजूचे झाड कापून रस्ता मोकळा केला. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू झाली. मात्र झाडांमुळे दोन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.