पांढऱ्या कांद्याला ‘अच्छे दिन’; अलिबागच्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर लोकप्रियता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 09:21 AM2023-04-09T09:21:15+5:302023-04-09T09:21:37+5:30
कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राला कधी बळकटी देणारे, तर कधी डोळ्यांत पाणी आणणारे पीक आहे.
अलिबाग :
कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राला कधी बळकटी देणारे, तर कधी डोळ्यांत पाणी आणणारे पीक आहे. मात्र रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात लागवड होणारा पांढरा कांदा म्हणजे जणू पांढरे सोनेच ठरले आहे. या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर त्याची लोकप्रियता वाढत असून, राज्यभरातून मागणी वाढत आहे. देश-विदेशात निर्यातीची तयारी केली जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे.
जिल्ह्यात पूर्वापार खंडाळा, पवेळे, नेहुली, सहाण, ढवर, कार्ले, रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, वरसोली, थळ, नवगाव, किहीम, आवास अशा अलिबाग नजीकच्या ठराविक गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची साधारणपणे २५० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते.
अलिबागचा पांढरा कांदा लाल गुलाबी कांद्यासारखा तिखट नसून गोड असतो. त्याला शुभ्र चकाकदार रंग असून, त्याला मोठे आयुर्वेदिक महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र रोहा, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी पुणे, जीएमजीसी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांनी संयुक्तपणे पेटंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया चेन्नई यांच्याकडे ‘अलिबाग पांढरा कांदा’च्या भौगोलिक मानांकनासाठी सन २०१९ मध्ये अर्ज केला होता.
कोरोना कालावधीमुळे त्याला उशीर झाला. मात्र, पांढऱ्या कांद्यास भौगोलिक मानांकन गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये प्राप्त झाले. आता प्रकल्प संचालक आत्मा आणि पणन महामंडळ यांच्यामार्फत शेतकऱ्यांचे ऑथोराइज्ड यूझर रजिस्ट्रेशन म्हणजेच अधिकृत नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.
कांद्याची एक वेणी ३ ते ४ किलो ग्रॅम असून, सरासरी २०० रुपये दराने विकली जाते. काही शेतकऱ्यांनी आता कांदा निर्यात करण्याची तयारी सुरू केली आहे.
या कांद्याचे उत्पादन हेक्टरी ३३ टन इतके येते. उत्पादनासाठी येणारा खर्च ४ लाख ५० हजार प्रतिहेक्टरी १० लाख इतके उत्पादन एका हंगामात मिळते.
साधारण २५ हजार प्रतिटन हा दर मिळाला तर प्रतिहेक्टरी ५ लाख निव्वळ नफा हे पीक मिळवून देत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.
कांदा कुजत नाही
हा कांदा पातीसह काढल्यानंतर सुकविण्यात येतो व पहाटेच्या वेळी त्याची वेणी बांधली जाते. नंतर वेणीसह कांदे विक्रीसाठी बाजारात येतात. त्यामुळे पानातील ॲबसिक ॲसिड कांद्यात उतरते आणि त्याला सुप्तावस्था प्राप्त होते. या वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रियेमुळे पांढरा कांदा न कुजता वर्षभर हवेशीर वातावरणात चांगल्या पध्दतीने टिकतो. त्यामुळे त्याला वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो. कांद्यातील कमी प्रमाणातील सल्फर घटक आणि समुद्रालगतचे खारे वारे व रेतीमय उथळ हलकी जमीन यामुळे या कांद्याला वैशिष्ट्यपूर्ण चव येते. या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे त्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. परिणामी, मागणीही वाढली आहे.