अलिबागचा प्रवास महागणार; गेट वे - मांडवा तिकीट दरात १५ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 11:49 PM2020-03-08T23:49:26+5:302020-03-09T06:30:01+5:30
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग तालुक्यातील मांडवादरम्यान दरवर्षी जवळपास १५ लाख प्रवासी या जलवाहतूक सेवेचा लाभ घेत असतात.
अलिबाग : अलिबागवरून मुंबईसाठी अथवा मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी हल्ली चाकरमानी प्रवासी सागरी मार्गाचा पर्याय निवडत आहेत. मुंबई ते अलिबाग हे अंतर एसटी किंवा इतर वाहनांपेक्षा सागरी मार्गाने कमी वेळात गाठता येते. म्हणून दररोज असंख्य प्रवासी या सागरी मार्गाचा उपयोग करतात. परंतु काही दिवसांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता गेट वे आॅफ इंडिया ते मांडवा ही लाँच सेवा अचानक महागली आणि त्याचा भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागला. ही दरवाढ कमी करावी, अशी मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग तालुक्यातील मांडवादरम्यान दरवर्षी जवळपास १५ लाख प्रवासी या जलवाहतूक सेवेचा लाभ घेत असतात. या सेवेचे महत्त्व अलिबाग, रोहा आणि मुरूड तालुक्यांसाठी मोठे आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी पूर्वी १४५ ते १९५ रु पयांचा दर आकारला जात होता. यात २० रु पये प्रवासी कर आणि ५ रु पये सुरक्षा कराचा समावेश होता. मात्र आता या जलवाहतुकीसाठी १६५ ते २१५ रु पये मोजावे लागणार आहेत. तिकीट दरात १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर मुंबईहून एलिफंटा बेटावर जाणाऱ्या डिलक्स बोटींच्या दरात १५ ते २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
अचानक झालेल्या दरवाढीमुळे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मत्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांना लेखी स्वरूपातील पत्र लिहून सागरी प्रवासातील वाढलेले प्रवासी भाडे कमी करण्याची विनंती केली आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम या फेरी बोट चालविणाºया कंपन्यांचा करत आहेत. ही सागरी दरवाढ कमी करावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी दळवी यांनी केली आहे.