रायगड जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:07 PM2019-07-08T23:07:16+5:302019-07-08T23:07:44+5:30

संबंधित यंत्रणांनी केला अहवाल सादर : जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करण्याच्या दिल्या होत्या सूचना

All dams secured in Raigad district | रायगड जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित

रायगड जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित

googlenewsNext

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची पाहणी करून त्याचे अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असल्याचा अहवाल संबंधित यंत्रणांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.


जिल्ह्यात काळ प्रकल्प व हेटवणे प्रकल्प हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. त्यांच्यावर आधारित ४९ लघु पाटबंधारे योजना व ३६पाझर तलाव आहेत. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या उमटे पाणी साठवण तलावाचा बंधारा सुस्थितीत असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. सध्या या तलावात ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाची मुख्य माती भिंत व पाणी सांडवा, ट्रेंच गॅलरी सुस्थितीत आहे. या धरणाच्या सांडवा भिंतीचे आणि खालील बाजूस असलेल्या वाफा भिंतीत किरकोळ दगड निघाले असले तरी धरणास कोणताही धोका नाही, असे अहवालात म्हटले आहे.


मृदा व जलसंधारण विभागाकडील दहा तलावांच्या पाहणीचा अहवालही प्राप्त झाला आहे. त्यात माणगाव तालुक्यातील साई साठवण तलाव, तळा-तळेगाव, पहूर - रोहा, देवळे - पोलादपूर, खरसई -म्हसळा, नांदळा - महाड, पाषाणे-कर्जत, विन्हेरे- महाड, रातवड साठवण तलाव - माणगाव, रातवड मेंढाण साठवण तलाव - माणगाव या प्रकल्पांचा समावेश आहे. ही सर्व धरणे सुस्थितीत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. रायगड पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत येणाºया लघु पाटबंधारे योजनांचे तलाव सुस्थितीत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्यात रानवली लघु पाटबंधारे योजना (श्रीवर्धन) पाभरे (म्हसळा), कार्ले (श्रीवर्धन), कवेळे , ढोकशेत, घोटवडे, कोंडगाव आणि उन्हेरे (सुधागड), वरंध, कोथुर्डे, खिंडवाडी, खैर (महाड), फणसाड (मुरुड), श्रीगाव (अलिबाग), भिलवले (खालापूर), कलोते-मोकाशी, डोणवत ( खालापूर), साळोख , अवसरे (कर्जत), ही सर्व धरणे सुस्थितीत असल्याचे नमूद केले आहे.


अहवाल सादर करणाऱ्या यंत्रणा
यासंदर्भात संबंधित प्रकल्पांची पाहणी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद रायगड, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण विभाग या यंत्रणांनी आपापले अहवाल जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Web Title: All dams secured in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.