लोकमत न्यूज नेटवर्कउरण : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याचा फटका येथील जवाहरलाल नेहरू बंदरालाही बसला आहे.बंदराची कोणत्याही प्रकारची जिवितहानी, वित्तहानी होणार नाही यासाठी खबरदारी म्हणून मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून जेएनपीटीसह खासगी चार बंदरांच्या आॅपरेशनचे कामकाज पूर्णत: थांबविण्यात आल्याची माहिती जेएनपीटी प्रशासनाचे मुख्य प्रबंधक जयवंत ढवळे यांनी दिली.
निसर्ग चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर जेएनपीटीने बंदरातील कंटेनर मालाची आयात -निर्यातीचे काम थांबवले आहे. जेएनपीटी बंदरासह एनएसआयसीटी, भारत मुंबई कंटेनर टर्मिनल, जीटीआय, डीपी वर्ल्ड आदी पाचही बंदरातील आॅपरेशनचे काम बंद करण्यात आले आहे.
कंटेनरची चढ उतार करणाºया क्यूसी क्रेन्सचे बुम्स खाली करण्यात आले आहेत. आरएमसी क्रेन्सही बंद करण्यात आल्याने मध्यरात्रीपासून कंटेनर मालाची वाहतूकही ठप्प झाली आहे. बंदरातील लॅण्डींग जेट्टीला जहाजे आदळुन नुकसान होऊ नये यासाठी मालवाहू जहाजे बंदरातून काढून जवळपासच्या खोल समुद्रात नांगरुन ठेवण्यासाठी पाठविण्यात आली असल्याची माहिती जेएनपीटीचे डेप्युटी कॉन्झरवेटर कॅप्टन अमित कपूर यांनी दिली. तसेच छोट्या मोठ्या बोटी टगबोटी, पायलट बोटी मोरा, बेलापूर, उलवा खाडीत रवाना करण्यात आल्या आहेत.बंदराचे नुकसान टाळण्यासाठी चक्रीवादळाचा जोर कमी होईपर्यंत जेएनपीटी बंदरासह आणखी खासगी चारही बंदराचेही कामकाज थांबविण्यात आले असल्याची माहिती जेएनपीटी प्रशासनाचे मुख्य प्रबंधक जयवंत ढवळे यांनी दिली.