सर्वपक्षीयांचा आज जेएनपीटीवर मोर्चा; संप मागे घेण्यास पोलीस, प्रशासनाचा दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:45 AM2020-12-16T01:45:12+5:302020-12-16T01:45:22+5:30
जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात कामगार संघटनांनी सर्वपक्षीयांच्या पाठिंब्यावर बुधवारी (१६) आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
उरण : जेएनपीटीच्या विरोधात खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज, बुधवारी जाहीर करण्यात आलेला मोर्चा प्रशासन भवनावर धडकणार असल्याची माहिती कामगार नेत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात कामगार संघटनांनी सर्वपक्षीयांच्या पाठिंब्यावर बुधवारी (१६) आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मोर्चा रद्द करण्यासाठी पोलीसांमार्फत जोरदार प्रयत्न सुरू होते. यासाठी डीसीपींच्या मार्गदर्शनाखाली कोविडचे कारण देत दोन दिवसांपासून जोर बैठकाही मारून झाल्या आहेत. मात्र कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचे म्हणणे धुडकावून लावत मोर्चा काढण्याचा निर्धार कायम ठेवला असल्याची माहिती कामगार नेते आणि जेएनपीटी कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, भूषण पाटील, रवींद्र पाटील यांनी दिली. खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे दोन्ही खासदार कामगारांना न्याय मिळवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कामगारांचा नकार
कामगारांच्या मोर्चाच्या इशाऱ्यानंतर पोलीस आणि जेएनपीटी प्रशासनाकडून गेल्या तीन दिवसांपासून मोर्चा रद्द करण्यासाठी पोलीसांमार्फत जोरदार प्रयत्न सुरू होते. दबावतंत्रानंतरही कंटेनर टर्मिनलच्या खासगीकरणाच्या विरोधात १६ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेला मोर्चा मागे घेण्यास नकार दिला आहे.