उरण : नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणतर्फे शुक्र वार, २ फेब्रुवारी रोजी बहुचर्चित अशा चौथ्या बंदरावर (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) मोर्चा काढण्यात येणार आहे. जेएनपीटीतील सर्व टर्मिनलचे कामकाज ठप्प करण्याचा निर्धार माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे.जेएनपीटी आणि येथील इतर बंदरांमध्ये नोकर भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांवर नेहमी अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, शुक्र वार, २ फेब्रुवारीला चौथ्या बंदराचे काम प्रत्यक्षात सुरू होणार असून, सीएमए सीजीएम कंपनीचे सेण्टॉरस हे पहिले जहाज बंदरात दाखल होणार आहे.नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणच्या वतीने द्रोणागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, जेएनपीटीने सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्चाच्या नव्या बीएमसीटी बंदराची उभारणी जेएनपीटी बंदराजवळ केली आहे. सर्वाधिक लांबीचा आणि सुमारे ४८ लाख कंटेनर हताळण्याची क्षमता असलेले हे बंदर आहे. बंदरात तीन हजार नोकºया अपेक्षित आहेत. मात्र, फक्त १६५ लोकांनाच नोकºया देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ५५ प्रकल्पग्रस्तांनाच काम देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या डीपीडी धोरणामुळे येथील अनेक सीएफएस बंद पडले असून, अनेक सीएफएस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.डीपीडी धोरणामुळे हजारो स्थानिक बेरोजगार होणार असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पांमुळे स्थानिकांचा, मच्छीमारांचा व्यवसाय बंद पडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच एनएसआयजीटी, जीटीआय या बंदरात भरती केलेल्या परप्रांतीयांना नोकरीवरून काढून टाकून त्यांच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना नोकरी द्यावी, या सर्व नोकरभरती प्रक्रियेमध्ये जेएनपीटीने हस्तक्षेप करावा व जेएनपीटीने आपल्या सीएसआर फंडाचा वापर प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी करावा, यासह इतर मागण्यांसाठी शुक्र वारी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात १ लाख नागरिक, प्रकल्पग्रस्त सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार असल्याचे, समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. मोर्चाला माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार भाई जगताप आदींसह इतर नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे नोकरी व व्यवसाय बचाव समितीकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, शिवसेनेचे पं. स.सदस्य दीपक ठाकूर, काँग्रेसचे श्याम म्हात्रे, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.
चौथ्या बंदराविरोधात सर्वपक्षीय महामोर्चा, २ फेब्रुवारीला काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 7:05 AM